ईव्हीएम हॅकिंगचा आरोप म्हणजे देशाला बदनाम करण्याचा कट- भाजप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

एका अमेरिकेतील सायबर तज्ज्ञाद्वारे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) हॅक केल्याच्या काँग्रेसच्या आरोपाला भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ईव्हीएम हॅकिंगचा आरोप करणं म्हणजे देशाला बदनाम करण्याचा कट असल्याचं भाजपने काँग्रेसवर टीका करताना म्हटलं आहे.

ईव्हीएम हॅकिंगचा आरोप झाल्यानंतर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज (मंगळवार) एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्या परिषदेत त्यांनी हे आरोप केले आहेत. ईव्हीएम हॅकिंगचा आरोप काँग्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा खोडसाळपणा असून हा देशाला बदनाम करण्याचा कट असल्याचंही म्हटलं आहे. भाजपने या प्रकाराला केम्ब्रिज अॅनालिटीकाचा भाग 2 म्हटलं आहे. ईव्हीएमच्या हॅकिंगच्या आरोपांचं खंडन करताना प्रसाद म्हणाले की, 2019च्या निवडणुका हरल्यानंतरचं कारण राहुल गांधींनी आधीच शोधून ठेवलं आहे. एखाद्या विषयावर भाष्य करण्यापूर्वी त्या विषयाची माहिती जाणून घेण्याचे कष्ट राहुल गांधी करत नाहीत. प्रसाद यांनी कपिल सिब्बल यांच्यावर निशाणा साधताना काही प्रश्नही विचारले. अमेरिकन हॅकर सैयद सूजा याच्या पत्रकार परिषदेवेळी कपिल सिब्बल तिथे काय करत होते? असा प्रश्न रविशंकर यांनी उपस्थित केला.

हॅकेथॉन या कार्यक्रमावेळी सैयद सूजा हा मोठा हॅकर असल्याचं सांगण्यात आलं. मात्र, हा हॅकर तिथे अचानक अमेरिकेहून कसा प्रकट झाला? असा प्रश्न विचारतानाच सूजा याने केलेल्या आरोपांचंही खंडन केलं. गोपिनाथ मुंडे यांचा मृत्यू अनैसर्गिक नसून त्यांच्या मानेवर दुखापत होऊन त्यातून रक्तस्रावामुळे झाल्याचं प्रसाद यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे सूजा याने फक्त वायफळ आरोप केले आहेत. त्यांच्याकडे या आरोपांची निश्चिती करणारे कोणतेही पुरावे नाहीत, असंही प्रसाद यावेळी म्हणाले.

ईव्हीएमच्या हॅकिंगच्या आरोपांचं खंडन करताना प्रसाद म्हणाले की, जिथे जिथे काँग्रेसचा विजय झाला किंवा विरोधी पक्ष विजयी झाला तिथे ईव्हीएम हॅक झाले नव्हते, पण जिथे भाजपचा विजय झाला तिथे मात्र ईव्हीएम हॅक झाले, असा अजब तर्क कसा काय मांडला जाऊ शकतो? ईव्हीएम 20 वर्षांपूर्वी निवडणूक प्रक्रियेत समाविष्ट झाले. तेव्हा तर काँग्रेसचीच सत्ता होती. तेव्हा ज्यावेळी काँग्रेस आणि संबंधित पक्ष जिंकून आले तेव्हा ईव्हीएम चांगले होते. मात्र 2014 नंतर जिथे काँग्रेस हरला, तिथे ईव्हीएम हॅक झाल्याचे बहाणे बनवले जात आहेत. अशा प्रकारे आरोप करणं हा देशातील 90 कोटी मतदारांचा अपमान आहे.