रिकव्हरी रेटमध्ये हिंदुस्थान नंबर वन, आतापर्यंत देशात 42 लाख रुग्ण बरे

हिंदुस्थानात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. हिंदुस्थानातील रुग्ण बरे होण्याचा दर हा अमेरिकेपेक्षा जास्त आहे. शनिवारच्या आकडेवारीनुसार कोरोनाच्या रिकव्हरी रेटमध्ये हिंदस्थानने अमेरिकेला मागे टाकत पहिले स्थान मिळवले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 42 लाख 5 हजार 201 इतकी आहे. तर अमेरिकेत आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 41 लाख 91 हजार 894 इतकी आहे.

जागतिक स्तरावर सर्वाधिक कोरोना रुग्ण असणाऱयांच्या यादीत हिंदुस्थान दुसऱया स्थानावर आहे. जगभरातील एकूण रुग्णांपैकी 17 टक्के रुग्ण एकटय़ा हिंदुस्थानात आहेत. मात्र देशाचा रिकव्हरी रेट 79.28 टक्के आहे. हे प्रमाण अन्य देशांच्या तुलनेत अव्वल आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याचे श्रेय केंद्र सरकारच्या मजबूत रणनीतीला, कठोर उपाययोजनांना दिले आहे.

मृत्यूची आकडेवारी चिंताजनक

कोरोनामुळे होणाऱया मृत्यूची आकडेकारी अद्याप चिंताजनक आहे. गेल्या 24 तासांत दिवसभरात 93 हजार 337 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तसेच 1247 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत देशात कोरोनामुळे 85 हजार 619 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 53 लाख 8 हजार 15 इतकी झाली आहे. सध्या हिंदुस्थानात 10 लाख 13 हजार 964 रुग्णांकर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 42 लाख 8 हजार 432 जण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोना हिंदुस्थानात आला, त्याला 232 दिवस झाले आहेत. या कालावधीत आतापर्यंत सहा वेळा बरे झालेल्या रुग्णांची संख्या नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा अधिक आढळून आली आहे. देशात काल दिवसभरात 93 हजार नवे रुग्ण आढळले असले तरी सुमारे 95 हजार रुग्ण बरे झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या