गांधींच्या हत्येबाबत आक्षेपार्ह विधान, राहुल गांधींविरोधातील खटल्यावर 10फेब्रुवारीपासून नियमित सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महात्मा गांधींच्या हत्येत आरएसएसचा सहभाग असल्याचे विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केल्याने त्यांच्याविरोधात भिवंडी दंडाधिकारी न्यायालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याने मानहानीचा खटला दाखल केला आहे. भिवंडी न्यायालयात या खटल्यावर 10 फेब्रुवारीपासून नियमित सुनावणी घेण्यात येणार आहे.

भिवंडी येथील सभेत मार्च 2014 साली राहुल गांधी यांनी महात्मा गांधीच्या हत्येबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. गांधी यांच्या हत्येत आरएसएसचा हात असल्याचे विधान केल्याने स्वयंसेवक संघाच्या राजेश कुटे यांनी भिवंडी येथील दंडाधिकारी न्यायालयात राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला. यावर आज भिवंडी न्यायालयात सुनावणी घेण्यात आली त्यावेळी राहुल गांधी यांचे वकील ऍड. नारायण अय्यर यांनी न्यायाधीशांना माहिती देताना सांगितले की, आपले अशील राहुल गांधी विधानसभा निवडणुकांमध्ये सध्या व्यस्त असून ते तूर्तास न्यायालयात उपस्थित राहू शकत नाहीत.