
रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱयांचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. तारकपूर रस्त्यावरील साईदीप हॉस्पिटलजवळ पोलिसांनी दोघांना पकडले असून, त्यांच्या ताब्यातून एक लाख 35 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, या दोघांना इंजेक्शन देणाऱया त्यांच्या तिसऱया साथीदाराचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
ज्ञानेश्वर कौतुक हारपे (वय 21, मूळ रा. एन 5, सिडको, संभाजीनगर, हल्ली रा. एमआयडीसी, नगर) व महेश नारायण कुऱहे (वय 26, रा. सावेडी, नगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांकडून सुहास जगताप (रा. वांबोरी, ता. राहुरी) याचा शोध सुरू आहे.
साईदीप हॉस्पिटलजवळ दोनजण जास्त दराने रेमडेसिविर इंजेक्शन विकण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. कटके यांनी सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर दिवटे यांनी आदेश दिले. त्यानंतर दिवटे यांनी रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री करणाऱया व्यक्तीच्या मोबाईलवर बनावट ग्राहकाच्या मध्यस्थीने संपर्क करून रेमडेसिविर इंजेक्शनबाबत विचारपूस केली. त्यावेळी या व्यक्तीने एका इंजेक्शनची किंमत 37 हजार रुपये सांगितली. इंजेक्शन खरेदीसाठी होकार दिला असता, त्याने 10 ते 15 मिनिटांनी साईदीप हॉस्पिटल परिसरात येण्यास सांगितले. पथकाने इंजेक्शन खरेदीसाठी बनावट ग्राहक पाठवून साईदीप रुग्णालयाबाहेर सापळा लावून त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून पॉलिफार्मा कंपनीचे एक रेमडेसिविर इंजेक्शन, तीन मोबाईल, रोख रक्कम व दुचाकी असा एकूण 1 लाख 35 हजार 400 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. याप्रकरणी अन्न व औषध निरीक्षक खेडकर यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
































































