मेस्सीच्या 10 नंबरच्या जर्सीची निवृत्ती; अर्जेंटिना फुटबॉल संघाचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
लिओनल मेस्सी - अर्जेंटिना (२०१४)

हिंदुस्थानात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि पॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीच्या गौरवार्थ बीसीसीआयने त्यांच्या जर्सींना निवृत्त केले होते. आता तसाच सन्मान अर्जेंटिनाला 2022 साली फुटबॉलचे जगज्जेतेपद जिंकून देणाऱया लिओनल मेस्सीच्या 10 नंबरच्या जर्सीला लाभणार आहे. याबाबत खुद्द अर्जेंटिना फुटबॉल महासंघानेच घोषणा केली. त्यामुळे मेस्सीबरोबर त्याची 10 नंबरची जर्सीही निवृत्त होणार असून भविष्यात ती कोणत्याही अर्जेंटाईन फुटबॉलपटूच्या अंगावर दिसू शकणार नाही.

स्पॅनिश दैनिक मार्काला दिलेल्या मुलाखतीत अर्जेंटिना फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष क्लाउडियो चिक्की तापिया म्हणाले, जेव्हा मेस्सी राष्ट्रीय संघातून निवृत्त होईल तेव्हा त्याच्यानंतर कुणालाही 10 नंबरची जर्सी परिधान करण्याची परवानगी मिळणार नाही. 10 नंबरची जर्सी आता मेस्सीच्या गौरवार्थ कायमची निवृत्त केली जाणार आहे. आम्ही मेस्सीसाठी एवढेच करू शकतो.

अर्जेंटिनाच्या विजयात प्रशिक्षक लिओनल स्केलोनी यांचाही मोठा वाटा आहे. त्यांच्याच कारकीर्दीत अर्जेंटिनाने तीन जेतेपदे पटकावली आहेत. मेस्सीने आतापर्यंत अर्जेंटिनासाठी 180 सामन्यांत 106 गोल ठोकले आहेत. 2026 चा वर्ल्ड कप सुरू होईपर्यंत मेस्सीचे भवितव्य धोक्यात आहे. तो 2024 मध्ये अर्जेंटिनासाठी दुसऱयांदा कोपा अमेरिका ट्रॉफी जिंकून निवृत्त होऊ शकतो असा अंदाज आहे.