कोपरगाव येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत रिक्षाचालकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर मनमाड महामार्गावर पायी चालत जात असताना एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एका रिक्षाचालकाचा मृत्यू झाला आहे. सोमवार (दि. 24) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. बाळासाहेब पंढरीनाथ बारसे (वय-47) रा. दत्त मंदिर कुलकर्णी वस्ती येसगाव तालुका कोपरगाव असे मृत रिक्षा चालकाचे नाव आहे.

सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रिक्षा येसगाव बस स्थानकावर उभी करून बारसे हे पायी चालण्याचा व्यायाम करत होते. यावेळी अज्ञात वाहनाने त्यांना सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यात त्यांच्या डोक्याला मार लागला होता.

दरम्यान सकाळी रिक्षा चालक संजय पवार यांनी आपल्या मुलाच्या सहकार्याने त्यांना उपचारार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती केले होते. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळी न थांबता, अपघाताची माहिती पोलिसांना न देता निघून गेला.

याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुपारी येसगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष कैलास जाधव यांनी संघटनेच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.