
सामना ऑनलाईन, अॅडलेड
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सिडनी कसोटीत धमाकेदार शतक झळकावणाऱ्या रिषभ पंतचे सध्या कोडकौतुक सुरू आहे. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनीही त्याची प्रचंड तारीफ केली असून एका माजी कर्णधाराने त्याची तुलना थेट अॅडम गिलख्रिस्टशी केली आहे. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू गिलख्रिस्ट हा उत्तम यष्टीरक्षक तर होताच शिवाय एक स्फोटक फलंदाजही होता. रिषभ पंतने चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात 189 चेंडूत नाबाद 159 धावांची खेळी साकारली होती.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टींगने रिषभ पंतचा खेळ जवळून बघितला आहे. पॉन्टींग आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हील संघाला मार्गदर्शन करतो, पंत या संघाचा हिस्सा आहे. रिषभमध्ये मोठे फटके मारण्याची क्षमता असून त्याचं टायमिंग लाजवाब आहे असं पॉन्टींगने म्हटलंय. पंतच्या फलंदाजीची तारीफ करत असतानाच पॉन्टींगने त्याला विकेटकिपिंग म्हणजेच यष्टीरक्षणावर थोडा भर देण्याचा सल्ला दिला आहे.
रिषभ पंत हा महेंद्रसिंह धोनीपेक्षा जास्त शतकं ठोकू शकतो असा अंदाज रिकी पॉन्टींगने बांधला आहे. धोनीने हिंदुस्थानी संघाकडून बरेच कसोटी सामने खेळले आहेत मात्र त्याच्या नावावर कसोटीमध्ये फक्त 6 शतकं जमा आहेत. रिषभ पतं धोनीपेक्षा नक्कीच जास्त शतकं झळकावू शकतो असं पॉन्टींगचं म्हणणं आहे. रिषभ पंत अवघ्या 20 वर्षांचा असून शतक झळकावताना त्याने अनेक विक्रम स्वत:च्या नावावर केले आहेत. हिंदुस्थानाकडून ७२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियामध्ये शतक झळकावणारा रिषभ पंत हा पहिला यष्टीरक्षक बनला आहे. हिंदुस्थानचा सर्वात कमी वयाचा शतक झळकावणारा यष्टीरक्षकाचाही मान त्याने पटकावला आहे.




























































