मेट्रोमुळे रस्त्यांची कामे रखडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

‘अपग्रेडिंग मुंबई’ असे ब्रीदवाक्य असलेल्या मेट्रोची संपूर्ण मुंबईत कामे सुरू असल्यामुळे पालिकेला आपली रस्त्यांच्या दुरुस्तीची कामेच अनेक ठिकाणी सुरू करता आलेली नाहीत. मेट्रोने आधीच रस्ता अडवलेला असल्यामुळे रस्त्यांची कामे करताना पालिकेला अडचणी येत आहेत.

शहर आणि उपनगरातील रस्त्यांच्या दुरुस्तीची व रस्ते नव्याने बनविण्याची कामे पावसाळय़ात थांबविण्यात आली होती. त्यापैकी 507.62 कि.मी. लांबीच्या रस्त्यांची कामे पावसाळय़ानंतर ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे नियोजन पालिकेने केले होते. त्यापैकी 202.31 कि.मी. रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत, तर उर्वरित 305.08 कि.मी. लांबीच्या रस्त्यांची कामे अद्याप सुरू व्हायची आहेत. यापैकी बरीचशी कामे ही वाहतूक पोलिसांच्या परवानगीशिवाय रखडली असल्याचे अधिकाऱयांचे म्हणणे आहे. एरवी ऑक्टोबर महिन्यात सुरू होणारी कामे यंदा नोव्हेंबर उजाडला तरी रखडलेली आहेत.

मुंबईत आधीच मेट्रोची कामे सुरू असून मेट्रोच्या बॅरिकेडस्नी अर्धेअधिक रस्ते व्यापलेले असल्यामुळे अनेक भागांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाहतुकीचा खोळंबा नेहमीचाच झाला आहे. अशा परिसरात रस्त्यांच्या दुरुस्तीची किंवा संपूर्ण रस्ता नव्याने करण्याची कामे असतील तर ती पालिकेला हाती घेताना अडचणी निर्माण होत आहेत. अनेक ठिकाणी वर्दळीचा रस्ता असल्यामुळे वाहतूक विभागातर्फे कामांना फक्त रात्रीचीच परवानगी दिली जाते, परंतु यावेळी मेट्रोच्या कामांमुळेही परवानगी दिलेली नसल्याचे अधिकाऱयांचे म्हणणे आहे.

मेट्रोमुळे रस्त्यांची कामे रखडली
पावसाळय़ामुळे थांबवण्यात आलेल्या 305.08 कि.मी. लांबीच्या रस्त्यांची कामे अद्याप सुरू झालेली नाहीत. यामधील 238.45 कि.मी. लांबीचे रस्ते हे ‘प्रकल्प रस्ते’ या वर्गवारीतील म्हणजेच पूर्ण रस्ता नव्याने करायचा आहे.

सुरू झालेली कामे
ऑक्टोबर 2018 पासून 202.31 कि.मी. लांबीच्या 624 रस्त्यांची कामे नव्याने हाती घेण्यात आली आहेत.
शहर भागात – 46.16 कि.मी.
पूर्व उपनगरात – 47.89 कि.मी.
पश्चिम उपनगरात – 108.26 कि.मी.