शिवसेनेने लावले श्री वैद्यनाथ मंदिर मार्गावर विविध भाषेतील दिशादर्शक फलक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रतिनिधी । परळी वैजनाथ

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनापक्षप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने आयोजित केल्या गेलेल्या भगवा सप्ताह अंतर्गत शिवसेनेच्या वतीने श्री वैद्यनाथ मंदिराकडे जाणाऱ्या सर्व मार्गावरील मुख्य चौकांत विविध भाषेतील दिशादर्शक फलक लावण्यात आले. या दिशादर्शक फलकांमुळे बाहेरून श्री वैद्यनाथ मंदिर येथे येणाऱ्या भाविकांना मोठी मदत होणार आहे. दिशादर्शक फलक नसल्याने वैद्यनाथ मंदिरात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होत होती हीच बाब लक्षात घेत हे फलक लावण्यात आले.

शहरातील अबुल कलाम आझाद चौक,वडार उड्डाण पूल, बाळकृष्ण रोडे चौक, राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकासह अनेक ठिकाणी हे दिशादर्शक फलक बसवण्यात आले आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तिनही भाषेमध्ये हे फलक लावण्यात आले आहेत. शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली भगव्या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे, शहर प्रमुख राजेश विभूते, उप शहर प्रमुख अभिजित धाकपडे, मोहन राजमाने, किशन बुंदेले, युवानेते अमर टाकळकर, संतोष चौधरी, सुदर्शन यादव, कृष्णा सुरवसे, शुभम जोशी, अनिल शिंदे आदी परिश्रम घेत आहेत.