भ्रष्ट मित्रासाठी गोरगरीब तरुणांना बदनाम करू नका; इतक्याही लाजा विकू नका..! रोहित पवार यांचा पुणे पोलिसांवर संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली विद्यार्थ्यांचे मागील आठ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेल्या एफआयआरवर आमदार रोहित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पोलिसांच्या या कारवाईचा निषेध करताना, ‘भ्रष्ट मित्रासाठी गोरगरीब युवा पिढीला कशाला बदनाम करता? इतक्याही लाजा विकू नका,’ असा सवाल करत त्यांनी पुणे पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करून पुणे पोलिसांवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “पुणे सीपी साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? गोरगरीब विद्यार्थी, शेतकरी आणि कष्टकऱ्यांची मुलं, महाराष्ट्राचं उद्याचं भविष्य असलेल्या तरुणांना आतंकवादी, दहशतवादी आणि गुप्तहेर म्हणणाऱ्या पुणे पोलिसांचा जाहीर निषेध! इतक्याही लाजा विकू नका..! मुख्यमंत्री महोदय, आपल्या विभागातील बिनडोक अधिकाऱ्यांना थोडी समज द्या… भ्रष्ट मित्रासाठी गोरगरीब युवा पिढीला कशाला बदनाम करता?” असा संताप रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.