
सामना प्रतिनिधी । नगर
नगर जिल्ह्यात सध्या दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने रोजगार हमी योजनेच्या कामांना मागणी वाढली आहे. या कामांवर रोज मजूर वाढत आहेत. गावातच रोजगार उपलब्ध करुन दिला जात असल्याने दुष्काळात भटकंती काही प्रमाणात थांबली आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायत आणि अन्य सरकारी यंत्रणांकडून दोन हजार कामे सुरू असून या कामांवर 7 हजार 428 मजूर काम करत आहेत.
राज्यात यंदा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. पाण्याची टंचाईच्या समस्येस तोंड द्यावे लागत आहे. रोजगाराचाही प्रश्न निर्माण होत आहे. नगर जिल्ह्यातही दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे रोजगार हमीच्या कामांना मागणी वाढली आहे. रोजगार हमीच्या कामांवर नेहमी साधारण चार ते साडे चार हजार मजूर असतात. परंतु दुष्काळामुळे यात वाढ झाली आहे. मागील आठवड्यात जिल्ह्यातील ठिकठिकाणी सुरू असलेल्या दोन हजार कामांवर 7 हजार 428 मजूर काम करत होते. आणखी काही दिवसात मजुरांची संख्या वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायतींकडून 1 हजार 463 कामे सुरू असून 4 हजार 222 मजूर काम करत आहेत. तर अन्य यंत्रणांमार्फत 549 कामे सुरू असून 3 हजार 206 मजूर काम कर आहेत. या व्यतिरिक्त रोजगार हमी विभागाने आणखी 31 हजार 910 कामांना मंजुरी दिली असून ही कामे देखील सुरू होणार आहेत.
रोजगार हमी योजनेत एका दिवसासाठी 203 रुपये मजुरी दिली जात आहे. सध्याच्या महागाईच्या दिवसात मजुरी मात्र कमीच आहे. सरकारनेही या बाबीचा विचार केल्याचे दिसत नाही. वाढत्या महागाईच्या दिवसात जीवनावश्यक वस्तूंचे दर सातत्याने वाढत असताना त्यातुलनेत रोजगार हमीवर कष्टाची कामे करणार्या मजुरांचा पगार मात्र वाढलेला नाही. उन्हातान्हाची काळजी न करता काम करणार्या या मजुरांच्या मजुरीत यंदा फक्त 2 रुपयांची वाढ केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावेळची वाढ अत्यल्प आहे. केंद्र सरकारने एप्रिल 2018 मध्ये जाहीर केलेल्या नव्या मजुरीच्या दरात राज्यासाठी दोन रुपयांची वाढ केली आहे. राज्यातील मजुरांना 201 ऐवजी 203 रुपये मजुरी मिळत आहे.
मजुरांची संख्या (कंसात सुरू असलेली कामे)
अकोले : 484 (152), जामखेड : 769 (174), कर्जत : 675 (185), कोपरगाव : 459 (195), नगर : 622 (123), नेवासा : 310 (75), पारनेर : 560 (130), पाथर्डी : 802 (166), राहता : 613 (200), राहुरी : 528 (208), संगमनेर : 554 (114), शेवगाव : 529 (83), श्राीगोंदा : 357 (76), श्रीरामपूर : 167 (131)

































































