रोखठोक – इतिहासपुरुष बाबासाहेब पुरंदरे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

rokhthokशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी इतिहास वाचायला आणि ऐकायला शिकवले. कोणाच्या अंगी देव येतो, निघून जातो, पण बाबासाहेबांच्या अंगी शिवशाहीचा इतिहास येत असे. तो आयुष्यभर शरीराचा, मनाचा भाग बनून राहिला. बाबासाहेबांसारखा शिवभक्त होणे नाही.

पंडित भीमसेन जोशी एकदा म्हणाले होते, ‘‘बाबासाहेब पुरंदरे तीन सप्तकांत आपलं व्याख्यान ‘गातात.’’ याचा प्रत्यय किमान 75 वर्षे तरी महाराष्ट्राने घेतला. बाबासाहेबांवर त्यांच्या हयातीत व मृत्यूनंतर बरेच लिहून आले. जगन्नाथ चव्हाण यांनी त्यांच्या आठवणींच्या पुस्तकात वेगळी माहिती दिली आहे. बाबासाहेबांच्या ‘शिवचरित्रा’वरील व्याख्यानांची सुरुवात एका ऐतिहासिक घटनास्थळी झाली आहे. 1954 च्या ऑगस्ट महिन्यात दादरा-नगरहवेलीत पोर्तुगीज सत्तेविरुद्ध लढा सुरू असताना त्याच भूमीवर बाबासाहेबांनी ‘शिवचरित्र’ सांगितले. आपल्या देशातून 15 ऑगस्ट 1947 या दिवशी इंग्रजांनी गाशा गुंडाळला हे खरे, पण गोवा, दीव, दमण, नगरहवेली या प्रदेशांवर पोर्तुगीजांची सत्ता होती. पोर्तुगीजांना हाकलून देण्यासाठी महाराष्ट्रातील तरुणांचे एक सशस्त्र पथक नगरहवेलीत पोहोचले. स्थानिक लोकांना लढण्यास प्रेरणा देऊन हे तरुण पोर्तुगीजांविरुद्ध लढत होते. या तरुणांच्या पथकाने पोर्तुगीजांना नामोहरम केले व त्यांचा दमण-दीववरील ध्वज खाली उतरवला. त्या तरुणांच्या पथकात नंतर ‘शिवशाहीर’ म्हणून ख्यातनाम झालेले बाबासाहेब पुरंदरेदेखील होते. नगरहवेलीच्या संग्रामात बाबासाहेब एक सक्रिय स्वयंसेवक होते. दमणगंगा नावाच्या नदीच्या काठावर राखोली हे छोटेसे गाव वसलेले आहे. या संग्रामाचा एक भाग म्हणून ते या भागात ‘गार्ड ड्युटी’ करीत होते. दमणगंगेच्या रम्य तीरावर तिथले जंगल, शांतता आणि पारतंत्र्याविरुद्ध लढण्यासाठी उभे राहिलेले, झपाटलेले तरुण यांच्या सान्निध्यात बाबासाहेबांना शिवरायांचा गुलामांविरुद्धचा लढा आठवला. त्याच ‘परतंत्र’ भूमीवर बाबासाहेबांनी ‘शिवचरित्र’ सांगून लोकांना लढण्याची प्रेरणा दिली. त्याच प्रेरणेतून पुढे पोर्तुगीज भूमीवर तिरंगा फडकला. बाबासाहेब हे प्रत्यक्ष युद्धभूमीवरच लढणारे सैनिक होते.

धार्मिक दरी नाही

शिवाजी महाराजांची महती सांगताना आज अनेकदा हिंदू-मुसलमान अशी दरी निर्माण केली जाते. बाबासाहेबांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या व्याख्यानात जाती, धर्मद्वेषाचा लवलेश नसे. कोणत्याही व्यक्तीची निंदा नसे. मधल्या काळात महाराष्ट्रात जाती-पातीचे विषारी प्रवाह उसळून आले. काही जातीय संघटना, पुढाऱ्यांनी बाबासाहेब पुरंदरेंविरुद्ध मोहिमा राबवल्या. त्यांना ठार करण्याच्या धमक्या दिल्या. बाबासाहेब हे कडवट हिंदुत्ववादी होते, पण ते कोणत्याही हिंदुत्ववादी संघटनेशी बांधील नव्हते, पण पुण्यात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले तेव्हा त्या पार्थिवाचा ताबाच जणू काही तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी घेतला. पार्थिवाच्या आसपास निवडक काळ्या टोप्या दिसू लागल्या. तेव्हा अनेकांनी नाराजी व्यक्त केली. बाबासाहेबांना जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. त्यांच्यावर अकारण चिखलफेक सुरू होती तेव्हा यापैकी कोणीच बाबासाहेबांच्या रक्षणार्थ पुढे आले नाही. खंत अशी की, ज्यांनी बाबासाहेबांवर घाणेरड्या पद्धतीने चिखलफेक केली, मारण्याच्या आणि गाडण्याच्या धमक्या दिल्या ते लोक वाजतगाजत ‘भाजपा’त गेले! बाबासाहेबांच्या मोठेपणाचे कोणी कधीच काही वाकडे करू शकले नाही!

जातीय संघटनांचा रोष

बाबासाहेब पुरंदरे छत्रपती शिवरायांच्या बाबतीत खोटा इतिहास सांगतात, अशी बोंब मधल्या काळात काही जातीय संघटनांनी उठवली, पण बाबासाहेबांच्या ‘शिवचरित्रा’त दंतकथा आणि आख्यायिकांना स्थान नाही. इतिहास जिवंत करणारे व्याख्यान ते देत. त्यांनी सादर केलेला ‘जाणता राजा’, ‘शिवराज्याभिषेक’ म्हणजे त्यांच्या उत्तुंग कल्पनाशक्तीची साक्ष देतो. पैसे कमावणे हा त्यांचा हेतू कधीच नव्हता. ‘शिवचरित्र’ गायनातून त्यांनी कोट्यवधी रुपये मिळवले. ते ज्या हातांनी मिळविले त्याच हातांनी त्यांनी ते सर्व समाजासाठी उधळले. मिळालेले धन ही ‘शिवचरित्रा’ची किमया आहे असेच ते मानीत. बाबासाहेब पुरंदरे हा सदैव ‘इतिहासात’ राहणारा माणूस. त्यांच्या पत्नी निर्मलाताईंना एकदा कोणीतरी विचारले की, ‘‘तुमच्या व बाबासाहेब यांच्या वयात अंतर किती?’’ तेव्हा ती माऊली सहज, पण मिश्कीलपणे म्हणाली, ‘‘साडेतीनशे वर्षे!’’ बाबासाहेब मनाने निर्मळ आणि पेहेरावाने साधे. झब्बा आणि पायजमा. झब्ब्याच्या रंगात अधूनमधून फरक पडायचा इतकेच. काही समारंभाप्रसंगी अंगात कोट आणि डोक्यावर फेटा चढे. बाबासाहेब इंग्लंडला गेले. याच पेहेरावात वावरले. एकदा याच पेहेरावात ते बकिंगहॅम पॅलेसमध्ये निघाले. इंग्लंडमधल्या मराठी मंडळींनी पेहेरावाबाबत नाके मुरडली. ‘‘बाबासाहेब पोशाख वाईट नाही, पण तुम्ही बकिंगहॅम पॅलेसमध्ये निघाला आहात.’’ मग बाबासाहेब म्हणाले, ‘‘का? काय वाईट आहे या पोशाखात?’’ मराठी मंडळ म्हणाले, ‘‘नाही, वाईट नाही, पण फेटा-सुरवार म्हणजे…’’, ‘‘हे पहा मंडळी, मी उतरवतो हा पोषाख आणि आपला राष्ट्रीय पेहेराव चढवतो. मग चालेल?’’ मंडळी म्हणाली,
‘‘हो चालेल…’’
मग बाबासाहेब म्हणतात, ‘‘लोकहो, हाच आपला राष्ट्रीय पोशाख आहे. तो परिधान केला म्हणून लाजायचे कशाला?’’
त्याच पोशाखात ते बकिंगहॅम पॅलेसमध्ये गेले. ‘जगदंबा’ तलवारीचे दर्शन घेऊन आले. बाबासाहेब हे असेच होते.

खोटी निंदा नाही

घटना कधीकाळी इतिहासात घडल्या, पण बाबासाहेबांना मात्र त्या प्रत्यक्ष डोळ्यांसमोर दिसत होत्या. ‘शिवचरित्र’ सांगताना त्यांनी अफझलखान पिंवा औरंगजेबाची खोटी निंदा कधी केली नाही. त्यांच्या भाषणात स्वराज्याच्या दुश्मनांचे खरे आणि श्रेष्ठ गुणही मुक्तकंठाने सांगितले. अफझलखानाच्या लहानमोठ्या सद्गुणांची माहिती बाबासाहेबांनी जेवढी दिलेली आढळते, तेवढी माहिती आदिलशाही दरबारातील महंमद नुश्रतीसारख्या शाही इतिहासकारानेही दिलेली आढळत नाही. ‘शिवचरित्र’ हाच त्यांचा ध्यास होता, तेच त्यांचे व्रत होते. ‘शिवचरित्र’ सांगताना त्यांनी कधीच कोणाचा अनादर केला नाही. त्यांच्या वागण्यात, वावरण्यात, बोलण्यात एक खानदानी डौल होता. इतिहासाचे खानदान आणि डौल आता संपला आहे.
सरदार नानासाहेब पुरंदरे यांनी बाबासाहेबांच्या बाबतीत दिलेला एक संदर्भ देतो व विषय संपवतो.

“शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर जिजाऊसाहेबांच्या मृत्यूसारख्या अनेक अशुभ घटना घडल्या. ‘राज्याभिषेकाचा मुहूर्त चांगला नव्हता, महाराजांनी पुन्हा राज्याभिषेक करवून घ्यावा’ असे निश्चलपुरी गोसावीचे म्हणणे पडले. त्याप्रमाणे महाराजांना दुसऱ्यांदा राज्याभिषेक झाला हे बाबासाहेबांकडून समजले तेव्हा वाटले, महाराजांना तिसऱ्यांदाही राज्याभिषेक झाला आहे व तो केला आहे बाबासाहेबांनीच! कारण बाबासाहेबांच्या व्याख्यानमाला सुरू होण्यापूर्वी इतिहासाच्या पुस्तकातून ‘शिवाजीने शाहिस्तेखानाची बोटे तोडली’, ‘शिवाजीने अफझुलखानाचा वध केला’, ‘शिवाजीची आग्र्याहून सुटका’ असा शिवाजी महाराजांचा एकेरी नावाने उल्लेख केला जात असे. शिक्षक, विद्यार्थी किंवा सर्व समाजच असा एकेरी नावाने संबोधत असे, पण बाबासाहेबांच्या ‘शिवचरित्रा’च्या, विशेषतः त्यांच्या व्याख्यानांच्या प्रभावामुळे आता कोणीही तसा एकेरी उल्लेख करणे शक्य नाही. मराठी माणसाच्या हृदयाच्या सिंहासनावर शिवाजी महाराज नेहमीच विराजमान झालेले होते, पण मराठी माणसाच्या वाणीवर सुसंस्कार घडवून त्या वाणीकडून बाबासाहेबांनी पुन्हा एकदा त्यांना ‘महाराज’पद मिळवून दिले व त्यासच मी तिसरा राज्याभिषेक समजतो. बाबासाहेबांचे हे तिसऱ्या अभिषेकाचे कर्तृत्व वादातीत आहे.

Twitter – @rautsanjay61
Email – [email protected]