रोखठोक : युद्ध, भाजप आणि काँग्रेस; निवडणुकीत सगळे माफ!

rokhthok

लोकसभा निवडणुकीत अद्यापि रंग भरायचे आहेत. युद्ध आणि सैनिक यांचा प्रचारात वापर करू नका, अशी तंबी निवडणूक आयोगाने दिली. इंदिराजींच्या काळात जे 1984 साली घडताना मी पाहिले तेच आता घडत आहे. निवडणूक जिंकण्यासाठी काहीही हेच सध्याचे धोरण. काँग्रेस नको, पण काँग्रेसवाले हवेत हा नवा मंत्र त्याचाच भाग आहे.

2019 ची निवडणूक ही नेहमीपेक्षा वेगळी आहे. 2014 सालातील नरेंद्र मोदी हे दिल्लीच्या दरवाजावर धडका मारीत होते. 2019चे मोदी दिल्ली टिकविण्यासाठी लढत आहेत. 2014 साली मोदी यांच्या तुलनेत राहुल गांधी हे कोणीच नव्हते. आज ते चित्र नाही. मनमोहन सिंग हे प्रधानमंत्री म्हणून ‘मुके व बधिर’ आहेत. महत्त्वाच्या विषयांवरही ते तोंड उघडत नाहीत. दातांच्या डॉक्टरकडे मनमोहन गेले तरी ते तोंड उघडणार नाहीत अशी टीका तेव्हा होत असे. 2014 ते 2019 या काळात प्रत्येक विषयावर बोलत राहणारा व सर्वाधिक बोलणारा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी विक्रम प्रस्थापित केला; पण जे बोलतात ते केले काय हा आता प्रचाराचा मुद्दा ठरेल. मनमोहन, सोनिया गांधी प्रचारात फार दिसणार नाहीत. त्यामुळे राहुल गांधी व प्रियांका गांधी हेच प्रचाराच्या रथावर स्वार होतील. श्री. मोदी यांच्या झंझावातापुढे ते कितपत टिकून राहतील हा प्रश्न आहे.

इंदिराजी (1984) व युद्धज्वर
युद्ध आणि सैनिक यांचा वापर प्रचारात करू नये अशी तंबी शेवटी निवडणूक आयोगाला द्यावी लागली. पुलवामातील हल्ला व त्यानंतरचे पाकिस्तानवर केलेले हवाई हल्ले याबाबत विरोधकांनी शंका उपस्थित केल्या आहेत. युद्ध परिस्थिती निर्माण करणे व निवडणुकीला सामोरे जाणे हा राजकीय खेळ असतो व त्यावर मागच्या रविवारी याच स्तंभात लिहिले. 1984 साली याच प्रकारच्या घडामोडी दिल्लीत घडत असताना मी पाहिल्या आहेत. 1984च्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये हिंदुस्थान-पाक युद्ध होणारच असे शपथेवर सांगणारे लोक तेव्हा दिल्लीत होते. त्याबाबत चर्चा अशी होत असे व ती जरा औरच होती.
‘आधी हल्ला कोण करणार?’
‘अर्थात पाकिस्तान!’
‘जनरल झिया आपणहून करणार की त्यांचे सूत्रधार त्यांना करावयास लावणार?’
‘कदाचित हिंदुस्थानी नेतेही त्यांना तसे करावयास सांगतील!’
‘म्हणजे, हिंदुस्थानच्या विनंतीवरूनच पाकिस्तान आपल्यावर हल्ला करील?’
‘होय, नक्कीच! कारण त्यात दोन्ही सत्ताधीशांचे हित आहे. सत्तेत निश्चितपणे राहण्यासाठी उभयतांना युद्ध खेळण्याइतका सोपा मार्ग नाही.’
‘युद्धाचे अनेक फायदे होतात. संरक्षण खात्याला हवी ती भरपूर सामुग्री घेता येते. लोकांना राज्यकर्त्यांना अपरिहार्य पाठिंबा द्यावा लागतो आणि मग निवडणूक ताबडतोब घेण्याचीही गरज उरत नाही किंवा विरोधकांनी उठवलेले सरकारविरोधी इतर विषय मागे पडतात.’
‘जनरल झियांना निवडणुका नकोच आहेत. इंदिरा गांधींनाही त्या टाळावयाच्या आहेत. सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध झाले तर 1985 च्या जानेवारीत निवडणूक होऊ शकणार नाहीत व एक वर्ष लोकसभेची मुदत सहज वाढविली जाईल.’
‘किंवा युद्धात यश मिळाले असे जाहीर होईल आणि इंदिरा गांधी निवडणूक सहज जिंकतील.’
‘शेवटी निवडणूक न होण्यासाठी युद्धाची गरज आहे व विजयासाठीही युद्धाची गरज आहे.’

1984 सालातही परकीय आक्रमणाचा धोशा इंदिरा गांधींनी चालविला होता. देशात युद्धाचा ज्वर आहे व युद्धासाठी भूमिका तयार करण्याचे काम तेव्हा इंदिराजी करीत होत्या. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर जाऊन इंदिराजी हिंदुस्थानला पाकिस्तानपासून धोका असल्याचे सांगत होत्या. ‘लॉसएंजिलिस टाइम्स’ला 6 मार्च रोजी राजीव गांधींनीही एक मुलाखत दिली व म्हणाले, ‘चार दिवसांच्या आत पाकिस्तानी फौजा पूर्ण सामर्थ्यानिशी हिंदुस्थानवर आक्रमण करण्याची शक्यता आहे.’ मोदी हे राजकीय फायद्यासाठी युद्धाचा वापर करीत आहेत असे ज्या विरोधकांना वाटते त्यांनी 1984 साली इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी निर्माण केलेल्या युद्धज्वराकडे पाहायला हवे; पण त्याच काळात इंदिरा गांधींची हत्या झाली व सहानुभूतीच्या लाटेवर राजीव गांधी मोठय़ा बहुमताने सत्तेवर आले.

प्रत्येकाचे तर्क वेगळे
निवडणुकांच्या दृष्टीने परिस्थिती कशी आहे? त्यावर प्रत्येक वृत्तवाहिनी तर्क लढवीत आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला 282 जागा मिळणार नाहीत व राष्ट्रीय लोकशाही आघाडीची धाव बहुमताच्या सीमारेषेवर येऊन थांबेल, असे आजचे अंदाज आहेत. 2014 साली निरंकुश सत्ता मोदी यांना मिळाली. काँग्रेसविरुद्ध नाराजी, टोकाचा विषारी प्रचार या दोन कारणांमुळे ही निरंकुश सत्ता भाजपास मिळाली. ती निरंकुश सत्ता टिकवण्याचे आव्हान आज मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपासमोर आहे. एक म्हणजे काँग्रेसमुक्त हिंदुस्थान हे मोदींचे स्वप्न गेल्या चार वर्षांत पूर्ण झाले नाही आणि दुसरे म्हणजे अनेक राज्यांत त्यांना प्रादेशिक व जिल्हा स्तरांवरील पक्षांशी तडजोडी करून लोकसभा निवडणूक लढवावी लागत आहे. संपूर्ण देश काबीज करणे व स्वबळावर हिंदुस्थान जिंकणे हे भाजपचे ध्येय होते. काँग्रेसमुक्त भारत हे गेल्या चार वर्षांतले भाजपचे ध्येय होते. ते सफल झाले नाही. उलट काँग्रेस पक्षातील नेत्यांची मुक्त भरती भाजपात झाली. श्री. मोदी यांनी दोन दिवसांपूर्वीच गांधी पुण्यतिथीच्या निमित्ताने सांगितले, गांधी द्रष्टे होते व त्यांना काँग्रेस स्वातंत्र्यानंतर बरखास्त करायची होती. भाजपने काँग्रेसलाच स्वतःमध्ये सामावून घेतले. सत्ता मिळविण्यासाठी आजही काँग्रेसची गरज भासते ती अशी. हे काँग्रेसचे यश आहे. विरोधी पक्षातील प्रमुख लोक फोडून सत्ताधारी अधिक मजबूत होतात. इंदिरा गांधींपासून महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण व शरद पवारांपर्यंत सगळय़ांनीच हे केले. भाजपने तेच केले तर टीका कशासाठी? जे वाऱयाच्या झुळकीबरोबर आले ते वाऱयाची दिशा बदलताच जातील! काँग्रेस नको, पण काँग्रेसचे लोक हवेत. इंदिरा गांधी नकोत, पण इंदिराजींची धोरणे हवीत. नवे राजकारण जुन्याच बाटलीत उसळत आहे.

Twitter- @rautsanjay61
Email- rautsanjay61@gmail.com