
रात्रीच्या वेळेस रेकी अथवा संशयास्पद हालचाली करणाऱया गुन्हेगारांना वेळीच जरब बसविण्यासाठी पोलिसांनी आता नवीन शक्कल लढवली आहे. रात्रीच्या सुमारास पोलिसांनी ‘रोको-टोको-फोटो’ ही विशेष मोहीम हाती घेतली असून यामुळे रात्रीचे विनाकारण फिरणाऱया तसेच गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे.
पोलिसांकडून रात्रीच्या वेळेस अधेमधे नाकाबंदी, हॉटेल- लॉजिंगची तपासणी केली जाते, परंतु परिमंडळ-4 मध्ये रात्रीचा पहारा अधिक तगडा करण्यात आला आहे. या परिमंडळअंतर्गत येणाऱया पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱयांनी ‘रोको-टोको-फोटो’ ही धडक मोहीम सुरू केली आहे.
या मोहिमेमुळे रात्रपाळी कर्तव्यावर असलेला स्टाफ अधिक ऍलर्ट राहील. विचारपूस करून फोटो काढल्यामुळे गुन्हा करण्याच्या हेतूने फिरणाऱयांमध्ये भीती निर्माण होईल. तसेच गुन्हा करून पळण्याच्या प्रयत्नात असलेले आरोपींचे नकळत फोटो काढले गेल्याने त्याचा फायदा नंतर गुह्याची उकल करण्यासाठी होतो असे पोलिसांकडून सांगण्यात आले. या मोहिमेमुळे वडाळा टी टी पोलिसांना दोघा चोरांना पकडण्यात फायदा झाला.
या मोहिमेनुसार रात्रीच्या वेळेस संशयास्पदरीत्या फिरणाऱयांना अडविले जाते. मग उशिरा का फिरतोय आदी विचारणा केली जाते. त्यानंतर संबंधित पोलीस कर्मचारी त्या व्यक्तीसोबत फोटो काढून तो पोलीस ठाण्याच्या ग्रुपवर टाकतात. अशा प्रकारे सध्या परिमंडळ-4 अंतर्गत सर्वत्र करडी नजर ठेवण्याबरोबर संबंधितांचे फोटो देखील काढून घेतले जात आहेत.
वडाळा टी. टी. पोलिसांनी ‘रोको-टोको-फोटो’अंतर्गत एकाचा फोटो काढला होता. त्या फोटोवरून सोनसाखळी व मोबाईल स्नॅचिंगचा गुन्हा उघडकीस आणण्यास पोलिसांना यश मिळाले. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि पोलिसांनी काढलेल्या फोटोमुळे आरोपी हे अनिल तिवारी व सतीश देवेंद्र हे असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी त्यांना पकडले.
जळगावमध्ये ‘रोको-टोको-फोटो’ या मोहिमेमुळे एक हत्येचा गुन्हा उघडकीस आणण्यास फायदा झाला होता. एकाची हत्या करून तिघे पळून जात असताना राहुरी येथे तैनात पोलिसाने त्यांचा फोटो काढला होता. तोच फोटो गुह्याची उकल करण्यास महत्त्वाचा ठरला होता. त्याचा फायदा आताही होईल.
– प्रवीण मुंढे, उपायुक्त (परिमंडळ-4)



























































