राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिक्षकाला दंडासह पट्टयाने मारहाण, चौघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक उत्सवामध्ये चार वर्षापूर्वी झालेल्या वादातून टोळक्याने संबंधित शिक्षकाला दंडासह चामडी पट्टयाने बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री सहकारनगरमध्ये घडली.

कुंदन सोनावणे, रुपेश खाडे, अमन शेख, हेमंत जाधव यांना अटक करण्यात आली. चार अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षवर्धन सुनिल हरपुडे (वय 21, रा. तावरे कॉलनी, सहकारनगर) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षवर्धन हरपुडे हे सहकारनगरमध्ये अध्यापक कॉलनीतील मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतील मुलांना प्रशिक्षण देतात. दरम्यान, चार वर्षांपुर्वी संघाच्या वार्षिक उत्सवामध्ये हर्षवर्धन यांची आरोपीसोबत वाद झाले होते. त्यामुळे आरोपींनी शाखेत जाणे बंद केले होते. मंगळवारी (दि. 7) ते नेहमीप्रमाणे शाखेत गेले होते. शाखा संपल्यानंतर ते मैदानाच्या बाजूला कट्टयावर बसले असताना काही मुले शाखेतील अमित हिरणवाळे याला मारहाण करत होती. त्यावेळी हर्षवर्धन यांनी मध्यस्थी केली असता, आरोपीं हेमंत जाधव, कुंदन सोनावणे यांनी त्यांना पट्टयासह झाडाच्या फांदीने बेदम मारहाण केली. त्याशिवाय लाकडी दंडानेही मारहाण करीत जखमी केले.

तरूणाला मारहाण केल्याप्रकरणी चारजणांना अटक करण्यात आली आहे. त्याशिवाय इतर चार अल्पवयीन मुलांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आणखी तपास सुरू आहे.

– सी. पी. बेरड, सहायक पोलीस निरीक्षक, सहकारनगर पोलीस ठाणे