
आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱया 25 टक्के कोटा आरटीई प्रवेशाला 8 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ऑनलाईन सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी दिलेली मुदत उद्या 25 एप्रिलला संपणार आहे. अद्यापही हजारो विद्यार्थ्यांचे प्रवेश घेणे बाकी असल्याने ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
5 एप्रिल रोजी जाहीर झालेल्या ऑनलाईन सोडतीत 94 हजार 700 विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांना शाळा प्रवेश घेण्यासाठी 25 एप्रिलपर्यंत मुदत दिली होती. मात्र या मुदतीत आतापर्यंत केवळ 13 हजार विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले असून 82 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले नाहीत. प्रवेश घेण्याच्या कालावधीत आरटीई प्रवेशाच्या वेबसाईटमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे काही दिवस वेबसाईटच बंद असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश घेता आलेले नव्हते.
प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी यापूर्वीच वेबसाईटच्या घोळामुळे प्रवेश घेण्याची मुदत वाढवून देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आता प्रवेश घेण्यासाठी 8 मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.





























































