1989चे अपहरण कांड – रुबैया सईदने यासिन मलिकला ओळखलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

1989 च्या अपहरणाच्या प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयात जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबैय्या सईदला पहिल्यांदाच हजर राहण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी विशेष सीबीआय न्यायालयात रुबैय्या सईद हजर झाली. शुक्रवारी, रुबैय्या सईदने 1989 च्या अपहरणाशी संबंधित प्रकरणात न्यायालयात जेकेएलएफ प्रमुख यासिन मलिक आणि इतर तिघांना ओळखले असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्या अपहरण प्रकरणात पाच दहशतवाद्यांची सुटका करून रुबैयाची सुटका करण्यात आली होती.

सीबीआयच्या वकील मोनिका कोहली यांनी सांगितले की, 1989 च्या अपहरण प्रकरणातील पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांची बहीण असलेल्या रुबैय्या सईद या साक्षीदाराचे जबाब न्यायालयात नोंदवण्यात आले. यावेळी तिने यासिन मलिकला ओळखले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 23 ऑगस्टला आहे. रुबैय्याने एकूण 4 आरोपींना ओळखले आहे. रुबैय्या सईदचे वकील अनिल सेठी यांनी सांगितले की, रुबैय्या ही सीबीआयच्या तपासादरम्यान तिला दिलेल्या छायाचित्रांच्या आधारे प्रत्येकाची ओळख पटवण्यास सक्षम आहे. त्यामुळे आता पुढील सुनावणीत हजर राहण्यास सांगितले आहे. तर यासीन मलिक म्हणत होता की त्याला वैयक्तिकरित्या जम्मूला उलटतपासणीसाठी आणण्यात यावे, असे सेठी यांनी सांगितले.

रुबैय्या सईद ही सध्या तामिळनाडूमध्ये राहते. सीबीआयकडून रुबैय्या ही फिर्यादी साक्षीदार म्हणून लिस्टेड आहे. 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला सीबीआयने हा तपास हाती घेतला. जेकेएलएफ प्रमुख यासिन मलिक हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. टेरर फंडिंग प्रकरणात त्याला नुकतीच जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

8 डिसेंबर 1989 रोजी मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबिया सईद दुपारी तीन वाजता ड्युटी संपवून घराकडे निघाली. त्यावेळी एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर ती श्रीनगरमधील रुग्णालयात इंटर्नशिप करत होती. लाल चौक येथून श्रीनगरच्या बाहेरील नौगामला जाणाऱ्या बसमध्ये ती चढली. या बसमध्ये दहशतवादी आधीच बसले होते. बस चानपुरा चौकाजवळ येताच तीन दहशतवाद्यांनी बंदुकीच्या जोरावर बस थांबवली. यावेळी रुबिया सईदला खाली उतरवून निळ्या रंगाच्या मारुती कारमध्ये बसवून त्यांनी पळ काढला. घटनेच्या दोन तासांनंतर जेकेएलएफच्या जावेद मीरने एका स्थानिक वृत्तपत्राला फोन करून भारताच्या गृहमंत्र्यांच्या मुलीच्या अपहरणाची जबाबदारी स्वीकारली. ही बातमी समोर येताच एकच खळबळ उडाली. व्हीपी सिंग यांनी केंद्रात सत्ता स्वीकारून एक आठवडाही उलटला नव्हता. यावेळी अपहरणकर्त्यांनी 7 दहशतवाद्यांना सोडण्याची मागणी केली होती.