
माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी यंदाच्या एप्रिल-मे या सुरक्षित कालावधीत अक्षरशः लालबागच्या राजाला जशी भाविकांची गर्दी होते तशी गर्दी झाली होती. अक्षरशः रांग लावून तब्बल 500 गिर्यारोहकांनी यंदा माऊंट एव्हरेस्ट सर केले. यात 4 हिंदुस्थानी नागरिकांचा समावेश असून एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा 70 वा वार्षिकोत्सव यंदा साजरा करण्यात आला.
29 मे 1953 मध्ये न्यूझीलंडच्या एडमंड हिलरी आणि नेपाळचा शेर्पा तेनजिंग नोर्गे यांनी जगातील सर्वात उंच माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले होते. 8,848.86 मीटर उंच माऊंट एव्हरेस्ट पहिल्यांदा सर करण्याच्या घटनेनंतर अनेक दुर्घटना घडूनही एव्हरेस्टची लोकप्रियता कायम आहे.
एव्हरेस्ट आरोहणाच्या मार्गातील सर्वात अवघड आणि धोकादायक ठिकाण म्हणजे खुंबू आइस फॉल. शेर्पांनी या मार्गावर लावलेल्या दोऱयांना हूक अडकवून आणि हिमघळींवर टाकलेल्या अरुंद शिडय़ा अत्यंत धिराने, एक एक पाऊल पुढे सरकवत ओलांडाव्या लागतात.
यंदा एव्हरेस्ट सर करताना चार नेपाळी, एक हिंदुस्थानी आणि एका चिनी नागरिकासह 11 गिर्यारोहकांचा मृत्यू झाला, तर 8 गिर्यारोहक त्यांच्या निष्काळजीपणामुळे बेपत्ता झाल्याची माहिती नेपाळच्या सरकारी सूत्रांनी दिली आहे.

























































