
वयाच्या दहाव्या वर्षी फिल्मी करीअरचं पहिलं गाणं गाणाऱ्या आशा भोसले गेली सात दशके सुरांच्या दुनियेची सफर करीत आहेत. ‘पद्मविभूषण’, ‘फिल्मफेअर’ असे असंख्य पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. या पुरस्कारांच्या शिरपेचात आता ‘महाराष्ट्रभूषण’चा तुरा राज्य सरकारने खोवला आहे. अष्टपैलू व सदाबहार गायिका असलेल्या आशाताईंना महाराष्ट्राने केलेला हा मानाचा मुजरा आहे. मलमली गळ्य़ाचा आणि मखमली आवाजाचा तर हा गौरव आहेच, पण या पुरस्काराने ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्काराचेही तेज वाढले आहे!
काही व्यक्तीच इतक्या उत्तुंग असतात की, त्यांनी उभं केलेलं विश्व आणि आकाशाला घातलेली गवसणी पाहून थक्क व्हायला होतं. साक्षात हिमालयालाही लाजवणारी उंची आणि त्यांचं कर्तृत्व असते. अशा अलौकिक व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने त्यांना मिळणाऱ्या मानसन्मानांनाही उजळून टाकत असतात. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर झालेल्या ‘महाराष्ट्रभूषण’ या पुरस्कारानेही महाराष्ट्राच्या या सर्वोच्च नागरी पुरस्काराची मान आणि शान अशीच उंचावली आहे. जगभरातील रसिकांच्या कानांवर आणि मनांवरही अधिराज्य गाजविणाऱ्या आशाताईंना हा पुरस्कार जाहीर होण्यास अंमळ उशीरच झाला हे खरे असले तरी आशा भोसलेंचा गोड गळा आणि त्यांचा चिरतरुण सूर हे महाराष्ट्राचे भूषण आहे हे त्रिकालाबाधित सत्य आहे. आशाताई या कालही महाराष्ट्राच्या ‘भूषण’ होत्या, आजही आहेत व भविष्यातही राहतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पुरस्कार निवड समितीच्या बैठकीने याच त्रिकालाबाधित सत्यावर सरकारी मोहर उठवली असेच आता म्हणावे लागेल. सूर, संगीत आणि कलेचा समृद्ध वारसा लाभलेल्या मंगेशकर घराण्यात आशाताईंचा जन्म जरूर झाला, पण त्यांचा मार्ग सोपा नव्हता. या खडतर आणि संघर्षमय नागमोडी वाटेवरील काटे वेचून आशाताईंनी तिथे आपल्या स्वरफुलांची पखरण केली. मधाळ आवाजाची शिंपण करीत त्यांनी ही पायवाट प्रशस्त केली आणि पाहता पाहता त्यांनी आपल्या अवीट गायकीचा एक दिमाखदार महामार्ग उभा केला. हा सगळाच
प्रवास चकित करणारा
आहे. स्वरसम्राज्ञी, गानकोकिळा लतादीदींची धाकटी बहीण हे तेजांकित वलय सतत सोबत वागवत असतानाही ‘आशा भोसले’ ही स्वतंत्र ओळख निर्माण करणे सोपे थोडेच होते? त्याचे दडपण न घेता आशाताईंची सांगीतिक वाटचाल सुरू राहिली. विशाल वृक्षाच्या छायेखाली आपली गायकी खुरटू न देता तसाच एक महाकाय वृक्ष आशाताईंनी उभा केला. हे करत असताना आशा भोसलेंनी आपला गळा कधी नजरकैदेत ठेवला नाही. विशिष्ट चौकटीत किंवा ठरावीक मूडचीच लक्ष्मणरेषा त्यांनी कधी बांधली नाही. महाकाय वटवृक्षाला जशा चौफेर पारंब्या फुटाव्यात तसे त्यांचे गाणे बहरत गेले. या पारंब्यांमध्ये ‘पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती’, ‘उठा उठा सकळ जन’, ‘प्रभाती सूर नभी रंगती’ यांसारखी असंख्य दर्जेदार भक्तिगीते आहेत. ‘दादी अम्मा दादी अम्मा मान जाओ’सारखी लहान मुलाच्या आवाजातील गाणी आहेत. भावगीत, नाटय़संगीत, लोकगीते, शास्त्रीय संगीत, लावणी, चित्रपट गीते, गझल आणि पाश्चात्य वळणाच्या पॉप संगीतापर्यंत गाण्याच्या प्रांतातील प्रत्येक पारंबीवर घट्ट पकड ठेवून आशाताई गात राहिल्या, मनसोक्त बागडत राहिल्या. आशा भोसलेंची हुकमत नाही असा एकही गायन प्रकार शोधूनही सापडणार नाही. त्यामुळेच ‘नाच रे मोरा आंब्याच्या बनात’ पिंवा ‘एका तळय़ात होती’सारख्या अफाट लोकप्रिय झालेल्या बालगीतांपासून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येकाला आशा भोसले भेटतातच. ‘उडे जब जब जुल्फे तेरी’, ‘हाल कैसा हैं जनाब का’ यांसारखी युगुलगीते असोत, ‘निगाहें मिलाने को’सारख्या तुफान गाजलेल्या कव्वाली असोत, ‘उमराव जान’मधील प्रसिद्ध गझला असोत, ‘पिया तू अब तो आ जा’सारख्या
उडत्या चालीची गाणी
असोत, ‘आईये मेहरबाँ’सारखी मादक गाणी असोत, ‘बुगडी माझी सांडली गं’सारख्या फेटे उडविणाऱ्या लावण्या असोत, विरहिणीची वेदना मांडणाऱ्या विराण्या असोत, ‘जिवलगा s s s’ अशी आर्त साद घालणारे गीत असो, ‘मलमली तारुण्य माझे’सारखे शृंगारगीत असो किंवा ‘सैनिकहो तुमच्यासाठी’सारखे जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे स्फूर्तिगीत असेल अशी कितीतरी अजरामर गाणी आशाताईंच्या दैवी गळय़ातून उमटली आहेत. पुन्हा ही प्रसिद्ध आणि लोकप्रिय गीतांची यादी इतकी मोठी आहे की, निवडक गीतांचा उल्लेख केला तर इतर गाण्यांवर अन्याय केल्यासारखे होईल. वयाच्या दहाव्या वर्षी 1948 मध्ये फिल्मी करीअरचं पहिलं गाणं गाणाऱ्या आशा भोसले गेली सात दशके सुरांच्या दुनियेची सफर करीत आहेत. मराठी आणि हिंदीतील यच्चयावत सर्वच आघाडीच्या संगीतकारांबरोबर आणि जुन्या जमान्यातील मधुबालापासून नव्या पिढीतील नायिकांपर्यंत असंख्य अभिनेत्रींना त्यांनी आपला आवाज दिला. तब्बल 14 भाषांमध्ये 12 हजारांहून अधिक गाणी गाण्याचा विश्वविक्रम आशाताईंच्या नावावर आहे. ‘पद्मविभूषण’, अनेक ‘फिल्मफेअर’ असे असंख्य पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. या पुरस्कारांच्या शिरपेचात आता ‘महाराष्ट्रभूषण’चा तुरा राज्य सरकारने खोवला आहे. अष्टपैलू व सदाबहार गायिका असलेल्या आशाताईंना महाराष्ट्राने केलेला हा मानाचा मुजरा आहे. मलमली गळय़ाचा आणि मखमली आवाजाचा तर हा गौरव आहेच, पण या पुरस्काराने ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्काराचेही तेज वाढले आहे!





























































