
सर्व प्रकारचे अडथळे बाजूला करून, महागाई, मंदीचे मळभ दूर सारून देशभरात नव्या उमेदीने दिवाळी साजरी होईल. निदान हे चार-पाच दिवस तरी सामान्य माणसाला काळजीची जळमटे दूर ठेवावीच लागतील. बाकी वर्षभर तो चिंता आणि काळजीच्या घाण्याला जुंपलेला असतोच. त्याच्यासाठी ही आनंदाची दिवाळी ठरो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर म्हणतात त्याप्रमाणे या दीपोत्सवाच्या प्रकाशाने देशभरात विवेकास आलेली अविचारांची काजळी फेडली जावो आणि विवेक दीप उजळो हीच प्रार्थना!
हिंदूधर्मीयांचा सर्वात आनंदाचा सण असणाऱ्या दिवाळीला सुरुवात झाली आहे. सर्वसामान्य माणसापासून व्यापारी-उद्योगपतींपर्यंत सर्वांच्या दृष्टीने हा सण उत्साहाचा आणि चैतन्याचा असतो. नवीन खरेदी ही सध्याच्या जमान्यात नावीन्यपूर्ण राहिलेली नसली तरी दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन खरेदीची परंपरा सर्वदूर पाळली जातेच. दिवाळी म्हणजे फटाक्यांची आतषबाजी, फराळाची रेलचेल, सोन्या-चांदीची खरेदी, आकाशकंदिलांची रोषणाई असाच सगळा माहोल असतो. त्यामुळे बाजारपेठा फुलतात, बहरतात. पुन्हा या वर्षी दिवाळी पूर्ण पाच दिवसांची आली आहे. सोमवारी धनत्रयोदशी आणि यमदीपदान झाले. आजच्या नरकचतुर्दशीच्या अभ्यंगस्नानापासून दिवाळीची खऱ्या अर्थाने सुरुवात होईल आणि पुढील तीन दिवस मुंबई-महाराष्ट्रासह देशभरात दिवाळीच्या अपूर्व उत्साहाचे ‘राज्य’ असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यावेळची दिवाळी केदारनाथ येथे साजरी करणार आहेत. याप्रसंगी ते केदारनाथपासून 400 मीटर अंतरावर असलेल्या ‘ध्यान गुंफे’चे (मेडिटेशन केव्ह) लोकार्पण करणार आहेत. केदारनाथ येथे जाणारे पर्यटक आणि ध्यानधारणेत रुची असणाऱ्या मंडळींसाठी ही एक आगळीवेगळी गोष्ट ठरेल. दिवाळी हा सणच असा मांगल्याचा, अध्यात्माचा, आरोग्याचा आणि उत्साहाचे उधाण देणारा आहे. आता या उत्साहाच्या वाटेवर नेहमीचे
अडथळे आणि काटेदेखील
आहेतच. त्यातील काही अस्मानी आहेत तर काही सुलतानी आहेत. महागाई, बेरोजगारी, आर्थिक मंदी, रुपया आणि शेअर बाजाराची घसरण, शेतकऱ्यांचे कर्जबाजारीपण, त्यात यंदा महाराष्ट्रावर असलेले दुष्काळ आणि पाणीटंचाईचे सावट, त्यातून भविष्यात उद्भवणारी भयंकर परिस्थिती, विशेषतः ग्रामीण महाराष्ट्राच्या अर्थकारणावर होणारे दुष्परिणाम, राज्यातील बिघडलेला सामाजिक सलोखा, फटाक्यांवर पडलेला न्यायालयाचा हातोडा, फटाके फोडण्यासाठी न्यायालयाने घातलेली रात्री 8 ते 10 या दोन तासांची कालमर्यादा, त्याचे उल्लंघन झाले तर असलेली कारवाईची टांगती तलवार असे असंख्य काटे-वरवंटे याही वर्षी सामान्य जनतेच्या मार्गात आहेतच. त्यातल्या त्यात चांगली गोष्ट इतकीच की ‘ग्रीन फटाक्यां’चे बंधन फक्त दिल्ली-एनसीआर या भागापुरतेच मर्यादित ठेवण्यात आले आहे. संपूर्ण देशावर ते बंधनकारक केले गेले नाही हे चांगलेच झाले. त्यामुळे कालमर्यादेत का होईना, पण जनतेला फटाक्यांचे ‘धडामधूम’ एन्जॉय करता येणार आहे. अर्थात असे अडथळे हिंदूंच्या सर्वच सणावारांच्या वेळी येत असतात आणि त्यावर मात करून, प्रसंगी त्यातून मार्ग काढत हिंदू आपले परंपरागत सण नेहमीच्या
जोशात आणि उत्साहात
साजरे करीत असतात. अर्थात महागाई आणि नोटाबंदीच्या तडाख्यातून अद्यापि न सावरलेली अर्थव्यवस्था, त्यातून मंदावलेली ग्राहकांची क्रयशक्ती याचा थोडाफार परिणाम दिवाळीच्या उलाढालीवर नक्कीच जाणवेल. किंबहुना तो जाणवतही आहे, पण म्हणून हिंदू मन नैराश्यात अडकून पडणारे नाही. ऋण काढून सण साजरा करावा असा त्याचा अर्थ नाही. मात्र शेवटी दिवाळी म्हणजे प्रकाशवाट दाखविणारा सण. धर्माने अधर्मावर, चांगल्याने वाईटावर विजय मिळविल्याचे प्रतीक म्हणून साजरा होणारा दीपोत्सव. त्यामुळे सर्व प्रकारचे अडथळे बाजूला करून, महागाई, मंदीचे मळभ दूर सारून देशभरात नव्या उमेदीने दिवाळी साजरी होईल. घराघरावर विद्युत रोषणाई, आकाशकंदील प्रकाशमान झालेले दिसतील. स्वयंपाकघरांमधून फराळाचा घमघमाट येईल. रांगोळ्यांनी अंगण, बाल्कन्या सजलेल्या दिसतील. लहानांपासून थोरांपर्यंत सगळेच ‘प्रकाशा’त न्हाऊन निघतील. निदान हे चार-पाच दिवस तरी सामान्य माणसाला नेहमीच्या काळजीची जळमटे दूर ठेवावीच लागतील. बाकी वर्षभर तो चिंता आणि काळजीच्या घाण्याला जुंपलेला असतोच. त्याच्यासाठी ही आनंदाची दिवाळी ठरो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर म्हणतात त्याप्रमाणे या दीपोत्सवाच्या प्रकाशाने देशभरात विवेकास आलेली अविचारांची काजळी फेडली जावो आणि विवेक दीप उजळो हीच प्रार्थना!





























































