सामना अग्रलेख – मुलायमसिंगांचा गौरव, हिंदुहृदयसम्राटांचे विस्मरण!

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व वीर सावरकर यांना या वेळी तरी ‘भारतरत्न’ने सन्मानित केले जाईल असे वाटले होते. मात्र तसे घडले नाही. सावरकरांच्या अपमानाचे राजकारण करणाऱ्या भाजपास वीर सावरकरांचा सन्मान करण्यापासून कोणी रोखले आहे? अयोध्येत करसेवकांचे रक्त सांडणाऱ्यांचा सन्मान केला जातो; पण ‘होय, बाबरी पाडणारे माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आणि गर्व आहे,’ अशी गर्जना करून अयोध्या आंदोलनात प्राण फुंकणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मात्र मोदी सरकारला विसर पडतो.

प्रजासत्ताक दिनी देशातील अनेक प्रतिष्ठित मंडळींना ‘पद्म’ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यातील बरीच नावे ही ‘संघ’ परिवाराशी संबंधित आहेत व त्याविषयी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. पंतप्रधान मोदी यांनी ‘ट्विटर’च्या माध्यमातून पद्म पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान म्हणतात, ‘पद्म पुरस्काराने गौरविण्यात आलेल्यांचे देशासाठी योगदान आणि प्रयत्न यामुळे भारत विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे.’ आता पंतप्रधान मोदी म्हणतात म्हणजे ते खरेच असणार. झाकीर हुसेन, सुमन कल्याणपूर, भैरप्पा, सुधा मूर्ती, कुमारमंगलम् बिर्ला अशांचा गौरव झाला तो योग्यच आहे. नेहमीप्रमाणे काहींना मरणोत्तर ‘पद्म’ पुरस्कार जाहीर झाले. त्यात डॉ. दिलीप महालनोबीस, कर्नाटकचे काँग्रेस नेते एस. एम. कृष्णा, बालकृष्ण दोशी व मुलायमसिंग यादव यांचा समावेश आहे. एस. एम. कृष्णा हे कर्नाटकातील काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आहेत. कर्नाटकातील ‘वोक्कालिगा’ समाजावर प्रभाव टाकण्यासाठी कृष्णा यांचा गौरव केला गेला, असे सांगितले जाते. कर्नाटकात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. त्यासाठी हा खटाटोप असला तरी कृष्णा यांच्यासारख्यांना त्यांच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल जिवंतपणी पुरस्कार का दिला जात नाही? हा प्रश्नच आहे. दिवंगत मुलायमसिंग यादव यांनाही पद्मविभूषण सन्मान देण्यात आला. हे आक्रितच म्हणावे लागेल. जिवंतपणी करसेवकांचे हत्यारे म्हणून त्यांची अवहेलना करणाऱ्या भाजप सरकारला मुलायम यांना मरणोत्तर सर्वोच्च नागरी

पुरस्कार देण्याची गरज

भासली हे महत्त्वाचे. अयोध्येत आता राममंदिर उभे राहात आहे व त्याच राममंदिराच्या नावावर प्रत्येक निवडणुकीत मते मागितली गेली, पण 1990 साली झालेल्या अयोध्या आंदोलनात त्या वेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असलेल्या मुलायमसिंग यादव यांनी करसेवकांवर निर्घृणपणे गोळय़ा चालवल्या. त्यात शंभरांवर साधू-संत, करसेवक मारले गेले व अनेकांची प्रेते तर शरयू नदीत फेकण्यात आली. करसेवकांच्या रक्ताने तेव्हा शरयू लाल झाली. त्या हत्याकांडानंतर भाजप व संघपरिवार मुलायमसिंग यांचा उल्लेख ‘मौलाना मुलायम’ असा करू लागले. त्यानंतर मुलायम यांनी असेही सांगितले की, ‘बाबरी मशीद वाचविण्यासाठी आणखी हिंदूंना गोळय़ा घालाव्या लागल्या असत्या तरी मागे-पुढे पाहिले नसते.’ मुलायम यांच्या अशा वक्तव्यानंतर भाजप व त्यांच्या परिवाराने मुलायमसिंग यांच्यावर हिंदूंच्या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, पण त्याच मुलायम यांना आता प्रखर हिंदुत्ववादी वगैरे म्हणवून घेणाऱ्या मोदी सरकारने ‘पद्म विभूषण’ हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला. श्री. मुलायमसिंग हे समाजवादी चळवळीचे मोठे नेते. राजकारणात, समाजकारणात त्यांचे कार्य मोठेच आहे, पण अयोध्या आंदोलनात त्यांनी करसेवकांवर गोळय़ा चालवून जो रक्तपात घडविला त्यामुळे ते देशभरातील हिंदू समाजाचे शत्रूच बनले ते कायमचे. मुलायमसिंग यांनी गोळीबार केला नसता तर संतापाचा भडका उडून हिंदू रस्त्यावर उतरला नसता व त्याचा राजकीय फायदा उत्तरेत भाजपास झाला नसता. ते

ऋण फेडण्यासाठीच

मुलायमसिंग यांना पद्मविभूषणाने सन्मानित केले काय? हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व वीर सावरकर यांना या वेळी तरी ‘भारतरत्न’ने सन्मानित केले जाईल असे वाटले होते. मात्र तसे घडले नाही. सावरकरांच्या अपमानाचे राजकारण करणाऱ्या भाजपास वीर सावरकरांचा सन्मान करण्यापासून कोणी रोखले आहे? अयोध्येत करसेवकांचे रक्त सांडणाऱ्यांचा सन्मान केला जातो; पण ‘होय, बाबरी पाडणारे माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आणि गर्व आहे,’ अशी गर्जना करून अयोध्या आंदोलनात प्राण फुंकणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मात्र मोदी सरकारला विसर पडतो. बाळासाहेबांच्या नावाने दुकान चालविणाऱ्यांचे सरकार महाराष्ट्रात आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे एक तैलचित्र विधानसभेत लावले त्याचा काय मोठा गाजावाजा केला! पण याच सरकारने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, वीर सावरकर यांची शिफारस भारतरत्नसाठी केली असती तर त्यांचे हे ढोंग लपले गेले असते, पण महाराष्ट्र व देशात ज्यांना नागरी पुरस्कार मिळाले त्यात बहुसंख्य हे संघ परिवाराशी संबंधित आहेत. अर्थात, त्याबद्दल आक्षेप घेण्याचे कारण नाही. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या रमेश पतंगे, भिकुजी इदाते यांचा सन्मान योग्यच आहे. गडचिरोलीच्या झाडीपट्टी रंगभूमीचा कलावंत परशुराम खुणे यांचा सन्मान सुखावणारा आहे, पण मुलायमसिंग यादवांचा गौरव करणारे मोदी शासन वीर सावरकर व बाळासाहेब ठाकरे या दोन हिंदुहृदयसम्राटांना मात्र विसरून गेले. लोकांनी या घटनेचे स्मरण ठेवायला हवे.