सामना अग्रलेख – हकनाक मांजाबळी..!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नायलॉनच्या मांजामुळे ज्या कुटुंबांतील लहान मुले, तरुण मृत्युमुखी पडले त्या कुटुंबांतील सदस्यांवर ऐन संक्रांतीच्या दिवशी शोक करण्याची दुर्दैवी वेळ आली. रस्त्यावरून चालणाऱ्या व दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांना नायलॉनच्या मांजाचा फास बसला आणि अनेकांच्या आयुष्याचा दोर अकालीच कापला गेला. हकनाक जाणारे हे मांजाबळी रोखायचे असतील तर किरकोळ विक्रेत्यांपेक्षा उत्पादक व पुरवठादारांवरच कारवाईचा कठोर बडगा उगारावा लागेल. संक्रांतीच्या पतंगबाजीचा उत्साह कायम ठेवून हे करणे सहज शक्य आहे.

मकरसंक्रांतीचा सण रविवारी देशभरात मोठय़ा उत्साहात साजरा झाला. तिळगुळाबरोबरच पतंगबाजी करून, पतंग महोत्सवाचे आयोजन करून महाराष्ट्र-गुजरातसह देशभरातील जनतेने या सणाचा मनमुराद आनंद लुटला. मात्र पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉनच्या मांजामुळे महाराष्ट्रासह विविध राज्यांत ज्या दुर्घटना घडल्या त्यात अनेकांना जीव गमवावा लागला. या धारदार मांजामुळे गळा, मान व हाताच्या शिरा कापल्या जाऊन अनेकजण गंभीररीत्या जखमी झाले. भिवंडी शहरात उड्डाणपुलावरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराचा गळा नायलॉन मांजाने कापला गेला आणि रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाला. नागपूर शहरात वेद नावाचा 10 वर्षांचा मुलगा वडिलांसोबत दुचाकीवरून जात असताना कटलेल्या पतंगाचा मांजा त्याच्या गळय़ाभोवती गुंडाळला गेला. गळा चिरला गेला आणि वडिलांच्या डोळय़ांदेखत वेद गतप्राण झाला. अकोला शहरातही आईसोबत दुचाकीवरून जाणाऱ्या साडेतीन वर्षांच्या मुलाचा गळा तब्बल 4 इंचांपर्यंत कापला गेला. क्षणार्धात तो रक्ताच्या थारोळय़ात पडला. केवळ नशीब बलवत्तर व डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे हा मुलगा मृत्यूच्या दाढेतून परत आला. संभाजीनगरातही स्पर्धा परीक्षा देऊन परतणाऱ्या तरुणाला मांजाचा गळफास बसल्याने तो गंभीर जखमी झाला. पुण्यातही नायलॉन मांजाचा फास बसल्याने दुचाकीवरून जाणारे दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. गतवर्षी नागपुरातच एका 20 वर्षांच्या तरुणाचाही नायलॉन मांजाने असाच बळी घेतला होता. दुचाकी चालवताना हेल्मेटमध्ये अडकलेला मांजा सोडवताना

गळय़ावर घासला गेला
आणि हा तरुण हकनाक जिवाला मुकला. गुजरातचा पतंगोत्सव तर जगप्रसिद्धच आहे. तिथेही संक्रांतीच्या पतंगबाजीत मांजाने गळा चिरून सहा जणांचा मृत्यू झाला. पुन्हा हे झाले माणसांचे. आकाशातून बागडणाऱ्या पक्ष्यांचे किती बळी दरवर्षी मांजामुळे जातात याची तर गणतीच नाही. नायलॉनच्या मांजावर बंदी असतानाही त्याची सर्रास विक्री होते आणि त्यामुळे होणाऱ्या दुर्घटनांची संख्याही दरवर्षी वाढते आहे. राष्ट्रीय व राज्य हरित लवादाच्या निर्णयानुसार देशातील विविध राज्य सरकारे नायलॉन मांजाच्या विक्री व साठवणुकीवर बंदी घालतात. संक्रांतीच्या आधी व नंतरही काही दिवस बंदीचा हा आदेश लागू असतो. तथापि, दरवर्षी लागू होणाऱ्या या तात्पुरत्या बंदीचा नायलॉन मांजाच्या विक्रीवर कोणताही परिणाम होताना दिसत नाही. याचे एकमेव कारण म्हणजे नायलॉनच्या धाग्याच्या उत्पादनावर नसलेली बंदी. अर्थात, पतंग उडवण्याशिवाय मासेमारीच्या जाळय़ात वा औद्योगिक उत्पादनातही अनेक ठिकाणी या धाग्याचा वापर होत असल्यामुळे प्लॅस्टिकपासून तयार होणारा नायलॉनचा हा कृत्रिम धागा तयार करणारे लहान-मोठे असंख्य कारखाने देशभरात विखुरले आहेत. मांजाची विक्री करणाऱ्या किरकोळ व्यापाऱ्यांवर या वर्षी महाराष्ट्रासह देशभरातच मोठय़ा प्रमाणावर कारवाया झाल्या. कोटय़वधी रुपयांचे मांजाचे साठे जप्त झाले. अनेक विक्रेत्यांना अटकही झाली; तरीही

पतंगबाजीसाठी
नायलॉन मांजाचा वापर झाला तो झालाच! हा धागा पतंगबाजीशिवाय अन्य ठिकाणीही मोठय़ा प्रमाणात वापरला जात असल्याने नायलॉन धाग्याच्या थेट उत्पादनावरच बंदी घालण्याचे पाऊल सरकारला उचलता येत नाही. त्यामुळेच मांजा उत्पादकांचे फावते. नायलॉनच्या धाग्यावर विविध रंग आणि रसायनांची प्रक्रिया व त्यात काचेची भुकटी मिसळून काही कारखानदार मुळातच मजबूत असलेला हा नायलॉन धागा अधिकच प्राणघातक बनवतात. देशांतर्गत कारखान्यांबरोबरच चीनमध्येही हा जीवघेणा धारदार मांजा मोठय़ा प्रमाणात तयार होतो आणि आपल्या देशात दाखल होतो. धाग्याच्या निर्मितीस लगाम घालण्यात अडचणी असल्या तरी नायलॉनच्या मांजाची निर्मिती करणाऱ्या कारखानदारांना शोधून आणि चीनमधून प्रचंड प्रमाणात हा मांजा मागवून देशभरात पोहोचविणाऱ्या पुरवठादारांच्या मुसक्या आवळल्याशिवाय नायलॉन मांजाच्या विक्रीस प्रतिबंध घालणे केवळ अशक्य आहे. नायलॉनच्या मांजामुळे ज्या कुटुंबांतील लहान मुले, तरुण मृत्युमुखी पडले त्या कुटुंबांतील सदस्यांवर ऐन संक्रांतीच्या दिवशी शोक करण्याची दुर्दैवी वेळ आली. रस्त्यावरून चालणाऱ्या व दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांना नायलॉनच्या मांजाचा फास बसला आणि अनेकांच्या आयुष्याचा दोर अकालीच कापला गेला. हकनाक जाणारे हे मांजाबळी रोखायचे असतील तर किरकोळ विक्रेत्यांपेक्षा उत्पादक व पुरवठादारांवरच कारवाईचा कठोर बडगा उगारावा लागेल. संक्रांतीच्या पतंगबाजीचा उत्साह कायम ठेवून हे करणे सहज शक्य आहे.