सामना अग्रलेख – ‘चक्रव्यूहा’त पुणे! अपघात आणि वाहतूक कोंडी

अपघातांचे जागोजागी ‘ब्लॅक स्पॉटस्’, वाहनांची बेसुमार गर्दी आणि बेशिस्त वाहनचालक, रस्ता तेथे वाहतूक कोंडी आणि महापालिकेतील ढिम्म सत्ताधारी व प्रशासन अशा ‘चक्रव्यूहा’त पुण्यातील रस्ते वाहतूक आणि पुणेकर नागरिक वर्षानुवर्षे फसले आहेत. त्यातूनच मग मर्सिडीज-बेन्झ या कंपनीच्या ‘सीईओ’सारख्या वरिष्ठ अधिकाऱ्याला आपल्या आलिशान गाडीतून उतरून रिक्षाने प्रवास करीत वाहतूक कोंडीतून स्वतःची सुटका करून घ्यावी लागते. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री वाहतूक कोंडीत अडकले नसते तर चांदणी चौकातील उड्डाणपूल कदाचित अजूनही हजारो पुणेकरांना दररोज ‘खिंडी’त गाठतच राहिला असता. नवले पूल तर अपघातांचा ‘पूल’ बनला आहे. तेथे रविवारी झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर तरी पुणे महापालिकेतील सत्ताधारी आणि संबंधित सरकारी यंत्रणेचे डोळे उघडणार आहेत का?

पुणे आणि वाहतूक समस्या या एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. आताही पुणे-बंगळुरू महामार्गावरील नवले पुलावर रविवारी रात्री एका विचित्र अपघाताने पुण्यातील वाहतूक प्रश्नाचे उग्र स्वरूप पुन्हा चव्हाटय़ावर आणले आहे. नवले पूल पूर्वीही अनेकदा चर्चेत आला आहे. मात्र रविवारी आतापर्यंतचा भीषण म्हणता येईल, असा अपघात तेथे घडला. साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने रविवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास रस्त्यावरील तब्बल 26 वाहनांना अक्षरशः उडविले. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. परंतु 10-12 जण गंभीर जखमी झाले. कंटेनरने धडक दिलेली दुचाकी, चारचाकी वाहने, रिक्षा यांचा पार चक्काचूर झाला. कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्याचा संशय आधी बोलला जात होता, मात्र वाहतूक शाखेच्या चौकशीत हा संशय खोटा ठरला. उतार असल्याने कंटेनरचालकाने इंजिन बंद केले आणि गिअर न्यूट्रल करीत वाहन चालविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो वेळेवर ब्रेक दाबू शकला नाही आणि पुढील भीषण दुर्घटना घडली. यासंदर्भात कंटेनरचालकावर जी काही कायदेशीर कारवाई व्हायची ती होईलच, पण वाहनमालकांचे जे नुकसान झाले, दुखापती झाल्या, मनस्ताप झाला त्याची भरपाई कशी होणार? नवले पूल हा अपघातांचा ‘ब्लॅक स्पॉट’ का ठरत आहे, याचा विचार निदान आता तरी होणार आहे का? मुळात नवले पुलासंदर्भात

अनेक आक्षेप

आहेत. कात्रज बोगद्यापासून नवले पुलापर्यंतच्या रस्त्याची जी रचना आहे, तिच्यावर प्रश्नचिन्ह लावले गेले आहे. या ठिकाणचा उतार अपघात घडविणारा ठरत आहे. या ठिकाणी वाहनचालकांना वाहन न्यूट्रलवर चालवून इंधन बचतीचा मोह हमखास होतो. त्या नादात पुढे ब्रेक आणि वाहनावरील त्यांचे नियंत्रण सुटते आणि दुर्घटना घडते. पुन्हा अपघातांना ‘ब्रेक’ लावण्यासाठी तेथे लावलेली ‘स्पीड गन’देखील उपायाऐवजी डोकेदुखीच ठरली आहे. कारण स्पीड गन दिसल्याने वाहनांचा वेग अचानक कमी होतो आणि मागच्या गाडय़ा येऊन आदळतात. या मार्गाचे सहा पदरीकरण मागील नऊ वर्षांपासून रखडले आहे. प्रत्येक वेळी अपघात पिंवा दुर्घटना झाली की पुण्यातील रस्ते वाहतुकीवर चर्चा होते आणि नंतर पुन्हा ती थंड्या बस्त्यात जाते. पुण्यातील वाहतूक हा सोशल मीडियावरील ‘मीम्स’चा पिंवा टिपिकल पुणेरी टवाळकीचा विषय नाही, तर तो प्राधान्याने गंभीरपणे विचारात घेण्याचा प्रश्न आहे. पुणे मेट्रोच्या श्रेयवादाचे टाळ कुटणारी मंडळी पुण्यातील अपघातांच्या ‘ब्लॅक स्पॉटस्’बद्दल मूग गिळून का गप्प असते? नवले पुलावर सातत्याने होणाऱ्या अपघातांचा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी गेल्या वर्षी थेट लोकसभेत उपस्थित केला होता. त्या वेळी अडचणी दूर करून तेथील रस्त्याचे काम सहा महिन्यांत पूर्ण होईल, असे

आश्वासन

केंद्र सरकारतर्फे देण्यात आले होते. या आश्वासनाचे काय झाले ते रविवारी 26 वाहनांचा जो चुराडा झाला त्यातून दिसलेच. पुणे महापालिकेने या ठिकाणी सर्व्हिस रोड करण्याचा प्रश्नही अधांतरी लटकला आहे. अपघातांचे जागोजागी ‘ब्लॅक स्पॉटस्’, वाहनांची बेसुमार गर्दी आणि बेशिस्त वाहनचालक, रस्ता तेथे वाहतूक कोंडी आणि महापालिकेतील ढिम्म सत्ताधारी व प्रशासन अशा ‘चक्रव्यूहा’त पुण्यातील रस्ते वाहतूक आणि पुणेकर नागरिक वर्षानुवर्षे फसले आहेत. त्यातूनच मग मर्सिडीज-बेन्झ या कंपनीच्या ‘सीईओ’सारख्या वरिष्ठ अधिकाऱ्याला आपल्या आलिशान गाडीतून उतरून रिक्षाने प्रवास करीत वाहतूक कोंडीतून स्वतःची सुटका करून घ्यावी लागते. पुन्हा शहराची अब्रू वेशीवर टांगणारी ही घटना, पण सोशल मीडियावर विनोद म्हणून ‘एन्जॉय’ केली जाते. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री वाहतूक कोंडीत अडकले नसते तर चांदणी चौकातील उड्डाणपूल कदाचित अजूनही हजारो पुणेकरांना दररोज ‘खिंडी’त गाठतच राहिला असता. तो पाडण्याचाही ‘इव्हेंट’ केला गेला. तरीही तेथील कोंडी सुटली का, हा प्रश्न कायमच आहे. नवले पूल तर अपघातांचा ‘पूल’ बनला आहे. तेथे रविवारी झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर तरी पुणे महापालिकेतील सत्ताधारी आणि संबंधित सरकारी यंत्रणेचे डोळे उघडणार आहेत का?