सामना अग्रलेख – आर्थिक महाबरबादीकडे…

7924

कोरोना व्हायरसच्या आपत्तीने निदान आमचा देश तरी आर्थिक महाबरबादीकडे जाताना दिसत आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कोसळल्या, त्याचा आनंदही घेता येणार नाही. कारण कोरोनाच्या साथीने घरचा बाजार कोसळला आहे. शिवाय त्याचा परिणाम म्हणून महागाई वाढेल, नोकऱ्या जातील, उत्पादन घटेल, घरच्या बाजारातील विक्री कमी होईल. कष्ट करणाऱ्यांनाही काम मिळणे कठीण होईल. त्यावर काय कसे उपाय शोधायचे यापेक्षा आपण दिल्लीची दंगल, सीएए, एनपीआर, मध्य प्रदेशातील राजकारण, महाराष्ट्रातले नवे कारस्थान यावरच कोळसा उगाळीत बसलो आहोत. कोरोना आपत्तीचे संकट मोठे आहेच, पण त्याहीपेक्षा त्यामुळे आपला देश ज्या पद्धतीने आर्थिक महाबरबादीकडे वाटचाल करीत आहे ते अधिक धोकादायक आहे. त्यावर सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे, पण जो तो फक्त आपलेच पाहत आहे.

हिंदुस्थानची अर्थव्यवस्था आधीच कोलमडली होती, ती आता साफ गाडली जाताना दिसत आहे. कोरोना व्हायरसच्या आपत्तीने जगाचीच अर्थव्यवस्था महाबरबादीकडे जाताना दिसत आहे. त्यात आपल्या देशाचे असे आहे की चीन, अमेरिकेतील शेअर बाजारात कुणी शिंकले-खोकले तरी इथला शेअर बाजार गडगडतो. आता तर कोरोनाच्या भयंकर साथीने जगभरात हाहाकार उडवला आहे. अर्थव्यवस्थेस बळकटी देणारा प्रत्येक घटक एकतर कोरोनाच्या भीतीने दरवाजे बंद करून बसला आहे किंवा अतिदक्षता विभागात मूर्च्छित होऊन पडला आहे. जगाची अर्थव्यवस्था ‘मास्क’ लावून चेहरा लपवून बसली आहे. या पडझडीचा फटका फक्त अंबानीसारख्यांनाच नाही, तर हातावर पोट असलेल्या प्रत्येकास बसणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ‘कोरोना’ला जागतिक साथ घोषित केल्यानंतर जगभरातील गुंतवणूकदार खचले आहेत. हिंदुस्थानचा शेअर बाजार नेहमीप्रमाणे जबरदस्त कोसळला. गुरुवारी एका दिवसात हिंदुस्थानी गुंतवणूकदारांनी 11.42 लाख कोटी रुपये गमावले. शेअर बाजार पडला की, अंबानी-अदानी वगैरेंना किती फटका बसला हे आधी पाहिले जाते. त्याबाबत माहिती अशी की, बाजार कोसळताच अंबानी 1.11 लाख कोटींनी गरीब झाले. त्यांच्या रिलायन्सचा शेअर मागच्या 52 दिवसांत सगळ्यात कमी भावावर पोहोचला. अंबानीसारख्यांना असा फटका बसणे याचा अर्थ आपल्या उद्योगजगतास मोठा फटका बसणे आहे. अंबानी हे हिंदुस्थानी उद्योग जगताचे प्रतिनिधित्व करतात. त्याचा परिणाम गुंतवणूक, रोजगार अशा सगळ्यांवर होऊ शकतो. रुपयाची स्थिती गेल्या पाच-सहा वर्षांत कधीच सुधारली नव्हती. ‘कोरोना’मुळे रुपया डॉलर्सच्या तुलनेत 74 रुपयांवर पोहोचला. हे काही चांगले घडेल असे वाटण्याचे लक्षण नाही. शेअर बाजार गुरुवारी कोसळला, तो 11 लाख कोटी रुपये घेऊन बुडाला. शेअर बाजाराच्या इतिहासातील ही

सगळ्यात भयंकर पडझड

आहे. आम्ही अनेकदा शेअर बाजार, जीडीपी अशा क्लिष्ट व सामान्यांशी संबंधित नसलेल्या अर्थविषयावर आमची मते व्यक्त केली आहेत. जीडीपी वाढतो आणि घसरतो याच्याशी सामान्य जीवनाचा काय संबंध लावता? पण कोरोनामुळे अर्थव्यवस्थेची जी पडझड सुरू झाली आहे त्यात हे सगळे विषय येतील असे दिसते. उद्योगपतींच्या जीवनमानात काहीच फरक पडणार नाही. त्यांच्या घोडय़ा-गाडय़ा, विमाने उडत राहतील, पण गरीबांच्या चुली विझतील. पर्यटन, हॉटेल उद्योग, विमान वाहतूक असे उद्योग इतक्यातच मेटाकुटीस आले आहेत. 53 देशांनी एकमेकांशी असलेली विमान वाहतूक थांबवली आहे. अमेरिकेने युरोपबंदी जाहीर केली. हिंदुस्थानातील त्यांच्या राष्ट्रीय विमानतळांवर शुकशुकाट आहे. विमान कंपन्यांना मोठा फटका बसला. आधीच डबघाईस आलेल्या या उद्योगातून मोठय़ा प्रमाणात नोकऱ्या जातील ही भीती आहे. पर्यटकांचा ओघ थांबला आहे. उद्योग-व्यवसायासाठी येणारी परदेशी मंडळे थांबली आहेत. पंचतारांकित हॉटेल, रोज होणारे राजकीय, शासकीय, कॉर्पोरेट, कौटुंबिक ‘इव्हेंटस्’ बंद पडले. त्यामुळे मुंबई, दिल्ली, बंगळुरूसारख्या शहरांतील अनेक पंचतारांकित हॉटेल्सचे मजलेच्या मजले रिकामे पडले आहेत. या क्षेत्रालाही फटका बसला आहे. ‘चित्रपट’ हा मोठा उद्योग आहे. आता बहुतेक मोठय़ा चित्रपटांचे चित्रीकरण थांबले. स्टुडिओत शुकशुकाट आहे आणि चित्रपटगृहे बेमुदत बंद केली. त्यामुळे येथेही अनेकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. संसर्गाच्या भयाने लोक बाजारहाट करायला कमी जात आहेत. त्यामुळे रिटेल बाजार, मॉल्सची अर्थव्यवस्था डगमगू लागली आहे. आंबा व इतर फळांच्या निर्यातीवरही मोठा परिणाम झाला आहे. सरकारने आखाती देशांच्या विमान सेवेवर निर्बंध घातल्यामुळे हवाईमार्गे होणारी 80 टक्के आंबा

निर्यात बंद

पडली आहे. फक्त कोकणातीलाच नाही, तर देशभरातील आंबा उत्पादक त्यामुळे हवालदिल आहे. हेच आता द्राक्ष, स्ट्रॉबेरी, सफरचंदाच्या बाबतीत होईल. पर्यटन उद्योगास अब्जावधी रुपयांचा फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. राजस्थानातील राजमहालात सुरू असलेले हॉटेल उद्योग बेजान झाले आहेत. हे सर्व चित्र चक्रावून टाकणारे आहे. हिंदुस्थानची अर्थव्यवस्था नोटाबंदी, जीएसटीसारख्या पाणचट प्रयोगांनी आधीच साफ खिळखिळी झाली आहे. संकटाच्या काळी समांतर अर्थव्यवस्था लोकांना जगवीत असते, पण मोदी सरकारने रोगापेक्षा इलाज भयंकर असे करून सामान्यांची सामान्य अर्थव्यवस्था खतम केली. पंतप्रधानांनी सर्व मंत्र्यांना परदेशी दौरे टाळण्याविषयी सांगितले आहे, पण पंतप्रधानांच्या आतापर्यंतच्या परदेश दौऱ्यांची 450 कोटी रुपयांची बिले अद्यापि एअर इंडियाला मिळाली नाहीत. त्यात हा आता कोरोनाचा फटका. अनेक राज्यांत शाळा-कॉलेजेस बंद केली. म्हणजे या आपत्तीचा फटका शैक्षणिक क्षेत्रासही बसतो आहे. कोरोना व्हायरसच्या आपत्तीने निदान आमचा देश तरी आर्थिक महाबरबादीकडे जाताना दिसत आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कोसळल्या, त्याचा आनंदही घेता येणार नाही. कारण कोरोनाच्या साथीने घरचा बाजार कोसळला आहे. शिवाय त्याचा परिणाम म्हणून महागाई वाढेल, नोकऱ्या जातील, उत्पादन घटेल, घरच्या बाजारातील विक्री कमी होईल. शेतावर, रस्त्यावर, बांधावर कष्ट करणाऱ्यांनाही काम मिळणे कठीण होईल. त्यावर काय व कसे उपाय शोधायचे यापेक्षा आपण दिल्लीची दंगल, सीएए, एनपीआर, मध्य प्रदेशातील राजकारण, महाराष्ट्रातले नवे कारस्थान यावरच कोळसा उगाळीत बसलो आहोत. कोरोना आपत्तीचे संकट मोठे आहेच, पण त्याहीपेक्षा त्यामुळे आपला देश ज्या पद्धतीने आर्थिक महाबरबादीकडे वाटचाल करीत आहे ते अधिक धोकादायक आहे. त्यावर सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे, पण जो तो फक्त आपलेच पाहत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या