सामना अग्रलेख – श्रीरामचरितमानस!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राममंदिराच्या उभारणीतून रामजन्मभूमीत शांतता नांदावी, राष्ट्रात एकात्मता राहावी, अहंकार नष्ट व्हावा याच रामराज्याचे स्वप्न आपण पाहिले होते. पित्यास दिलेल्या वचनास जागून प्रभू श्रीराम बंधू लक्ष्मण, सीतामाईसह 14 वर्षांच्या वनवासाला गेले. राजा गेला म्हणून राज्य संपले असे झाले नाही. कारण रामांची जन्मभूमी ही सत्य, प्रामाणिकपणाच्या आदर्शावर उभी राहिली. तोच प्रभू श्रीरामांचा स्वर्ग होता. त्या स्वर्गाचे रक्षण करणे हे शिवसेनेचे कर्तव्यच ठरते. शिवसेना अयोध्येच्या भूमीवर जाते ती त्याच हेतूने. आज आदित्य ठाकरेंसह शेकडो शिवसैनिक अयोध्येत प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतील. त्या रामजन्मभूमीतून नवी ऊर्जा घेऊन महाराष्ट्रात परत येतील. महाराष्ट्रात रामराज्य निर्माण करण्याचा हा रामचरितमानस आहे. विरोधकांनी त्यावर टीकेचे घाव घालत राहावे! राम आमच्या पाठीशी आहे!

देशातले वातावरण धार्मिकदृष्टय़ा तणावाचे होत असताना शिवसेनेची अयोध्यावारी आज होत आहे. भगवान श्रीराम हे फक्त हिंदुस्थानींना किंवा हिंदूंनाच नाही, तर समस्त मानवजातीसाठी आदर्श आहेत. श्रीरामांना परब्रह्माचे अवतार मानले जाते. जे मर्यादांच्या रक्षणासाठी अवतीर्ण झाले. सत्य, सदाचार, धर्मरक्षण हाच त्यांच्या अवताराचा मुख्य हेतू होता. श्रीरामाचे जीवनच हिंदुस्थानी संस्कृतीचा खरा आरसा आहे. त्यामुळेच ‘रामायण’, ‘रामकथा’चा प्रचार आणि प्रसार हिंदुस्थानी जनमानसात सर्वात जास्त होत असतो. मातृभूमी हाच स्वर्ग हा मंत्र प्रभू श्रीरामांनी दिला. ‘जननी आणि जन्मभूमी स्वर्गाहुनी श्रेष्ठ’ हा मार्मिक मंत्र श्रीरामांनीच दिला. जन्मभूमी श्रीरामांना अतिप्रिय होती व श्रीराम आपल्या सगळय़ांचे आराध्य आहेत. एकदा स्वामी श्रीकरपात्री महाराजांना एका भक्ताने विचारले, ‘‘हिंदुस्थानची संस्कृती आणि सनातन धर्माची महती सांगणारे अनेक ग्रंथ आहेत. असंख्य वेद आहेत, उपनिषदे आहेत. पुराण, उपपुराण आणि स्मृती आहेत. या सगळय़ांचे वाचन एकत्र कसे करता येईल? असा कोणता ग्रंथ आहे की जो वाचल्यावर संपूर्ण हिंदुस्थानी संस्कृतीचे दिग्दर्शन होईल.’’ त्यावर स्वामीजी म्हणाले, ‘‘कोणत्या एकाच ग्रंथात सनातन धर्म आणि हिंदुस्थानी संस्कृतीचे दर्शन करायचे असेल तर भगवान श्रीरामांची कथा ‘श्रीरामचरितमानस’ वाचा. या एकाच ग्रंथातून हिंदुस्थानी संस्कृतीचे दिग्दर्शन होईल. सनातन धर्माचे ज्ञान प्राप्त होईल.’’ हा त्या ग्रंथाचा महिमा नाही तर भगवान श्रीरामांच्या चरित्राचा महिमा आहे. ‘श्रीरामचरितमानस’मध्ये स्वयं भगवान श्रीराम आपल्या जन्मभूमीचे महत्त्व आणि महिमा वर्णन करतात. मातृभूमीचे रक्षण व प्रेम हा

श्रीरामांचा संदेश

शिवसेना जन्मापासून पाळत आहे. म्हणूनच अयोध्येच्या प्रत्येक आंदोलनात शिवसेना आघाडीवर राहिली. अनेक आक्रमणे, हल्ले, घाव पचवून अयोध्या उभी आहे. अयोध्येने सर्व हल्ले पचवले आहेत. शिवसेनेही तेच केले. त्यामुळे शिवसेना व अयोध्येचे एक नाते कायमचेच बनले. बाबरीच्या आंदोलनापासून ते प्रत्यक्ष राममंदिराच्या उभारणीपर्यंत प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा खारीचा वाटा आहेच. या खारीच्या वाटय़ास रामायणात सगळय़ात जास्त महत्त्व आहे. खारीचा वाटा नसता तर रामसेतू उभारला गेला नसता व प्रभू श्रीरामांना लंकेची स्वारी करून रावण प्रवृत्तीवर विजय प्राप्त करता आला नसता. महाराष्ट्रातील रावणांच्या लंकांनाही शिवसेनेने असेच उद्ध्वस्त केले. उद्धव ठाकरे हे अयोध्येत प्रथम गेले तेव्हा राममंदिराचा विषय थंडय़ा बस्त्यात पडला होता. उद्धव ठाकरे हजारो शिवसैनिकांसह अयोध्येत पोहोचले तेव्हा या थंड बस्त्याच्या गाठी सुटल्या. याप्रश्नी झोपलेले कुंभकर्ण जागे झाले व न्यायालयाच्या क्रियेला वेग आला. प्रभू श्रीरामाचेच आशीर्वाद म्हणून महाराष्ट्राला शिवसेनेचा मुख्यमंत्री मिळाला व मुख्यमंत्री म्हणून रामप्रभूंचे दर्शन घेण्यासाठी श्री. उद्धव ठाकरे पुन्हा अयोध्येत पोहोचले. श्रीरामजन्मभूमी हे एक ऊर्जास्तोत्र आहे. पुनः पुन्हा येत राहावे अशी रामजन्मभूमी आहे. या रामजन्मभूमीचा वाद शेवटी सर्वोच्च न्यायालयाने सोडवला. त्यामुळे रामभूमीचा पुन्हा राजकीय आखाडा बनू नये. हिंदू अस्मितेची ही भूमी साडेपाचशे वर्षांनंतर पुन्हा बाबराच्या आक्रमणातून मुक्त झाली व त्यासाठी शेकडो कारसेवकांना बलिदान द्यावे लागले. याच बलिदानातून आजचा भारतीय जनता पक्ष राखेतून झेपावला व सत्तेपर्यंत पोहोचला; पण देशात रामराज्य निर्माण झाले काय? दीनदुबळय़ांना न्याय मिळाला काय?

लोकांच्या चुली

पेटाव्या इतके उत्पन्न मिळते काय? शेतकरी, कष्टकरी मंडळींना त्यांच्या घामाचा मोबदला मिळतोय का? बेरोजगारांच्या हातांना काम आहे काय? कश्मीरातील हिंदूंचा रक्तपात का थांबत नाही? हिंदुस्थानी सीमांतून परक्यांची घुसखोरी सुरूच आहे व सैनिकांचे हौतात्म्यही वाढत आहे. हे कसले लक्षण मानायचे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अधांतरी ठेवून अयोध्येत राममंदिर उभे राहत आहे, पण प्रभू श्रीराम अशा रामराज्यास मान्यता देणार नाहीत. देशाचा माहोल बिघडला आहे. हिंदू-मुसलमानांत वादाच्या ठिणग्या उडवून राज्य करणे व निवडणुका जिंकणे हे रामराज्य नाही. अशाने रामाची जन्मभूमी पुनः पुन्हा दुभंगली जाईल व हिंसेने छिन्न-विच्छिन्न होईल. राममंदिराच्या उभारणीतून रामजन्मभूमीत शांतता नांदावी, राष्ट्रात एकात्मता राहावी, अहंकार नष्ट व्हावा. मानवतेचा विजय व्हावा याच रामराज्याचे स्वप्न आपण पाहिले होते. पित्यास दिलेल्या वचनास जागून प्रभू श्रीrराम बंधू लक्ष्मण, सीतामाईसह 14 वर्षांच्या वनवासाला गेले. त्या 14 वर्षांत अयोध्या नगरी श्रीरामांची वाट पाहत होती. राजा गेला म्हणून राज्य संपले असे झाले नाही. कारण रामांची जन्मभूमी ही सत्य, प्रामाणिकपणाच्या आदर्शावर उभी राहिली. तोच प्रभू श्रीरामांचा स्वर्ग होता. त्या स्वर्गाचे रक्षण करणे हे शिवसेनेचे कर्तव्यच ठरते. शिवसेना अयोध्येच्या भूमीवर जाते ती त्याच हेतूने. आज आदित्य ठाकरेंसह शेकडो शिवसैनिक अयोध्येत प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतील. त्या रामजन्मभूमीतून नवी ऊर्जा घेऊन महाराष्ट्रात परत येतील. महाराष्ट्रात रामराज्य निर्माण करण्याचा हा रामचरितमानस आहे. विरोधकांनी त्यावर टीकेचे घाव घालत राहावे! राम आमच्या पाठीशी आहे!