सामना प्रभाव : करजुवे-सुतारकोंड-विचारेवाडी आणि वातवाडीतील वाळू उत्खनन बंद, माफियांचे धाबे दणाणले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमेश्वर तालुक्यातील करजुवे-सुतारकोंड-विचारेवाडी आणि वातवाडी येथे बेसुमार वाळू उत्खनन सुरु असल्याचे वृत्त दैनिक सामनाने प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. या वृत्ताने वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. वृत्त प्रसिद्ध होताच करजुवे-सुतारकोंड-विचारेवाडी आणि वातवाडी येथील वाळू उत्खनन बंद करण्यात आले आहे.

संगमेश्वर तालुक्यातील करजुवे येथील सुतारकोंड-विचारेवाडी आणि वातवाडी येथे वाळूमाफियांनी उच्छाद मांडला होता. दिवसाढवळ्या या परिसरात वाळू उत्खनन सुरु होते. या वाळू उत्खननाकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होते. अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी या वाळूमाफियांकडे गांभिर्याने लक्ष दिले आहे. संगमेश्वर तहसीलदारांकडे त्यांनी संगमेश्वर करजुवे येथे सुरु असलेल्या वाळू उत्खननाची माहिती देऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच खनिकर्म विभागालाही प्रत्यक्ष त्याठिकाणी जाऊन पाहणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अपर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचे वृत्त दैनिक सामनामध्ये प्रसिध्द होताच वाळूमाफियांचे धाबे दणाणले. त्या बातमीनंतर स्थानिक प्रशासनही जागे झाले आणि तात्काळ करजुवे-सुतारकोंड-विचारेवाडी आणि वातवाडी येथील वाळू उत्खनन बंद झाले.

हीच तर खरी गंमत आहे
करजुवे-सुतारकोंड-विचारेवाडी आणि वातवाडी येथे बेसुमार वाळू उत्खनन सुरु असल्याचे वृत्त प्रसिध्द झाले. तसेच अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी कारवाई करण्याच्या सूचना देताच करजुवे येथील वाळू उत्खनन बंद झाले. हीच तर खरी गम्मत आहे. तात्पुरते वाळू उत्खनन बंद न होता वाळूमाफियांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. कायमस्वरुपी अवैध वाळू उत्खनन बंद केल्यास पर्यावरण समतोल राखला जाणार आहे. सरकारने ऑनलाईन वाळूखरेदी विक्री सुरु केली आहे. या ऑनलाईन पद्धतीचा वापर नागरिकांनी केल्यास या वाळूमाफियांना आळा बसेल. अवैध मार्गाने काढलेली वाळू कोणी खरेदी करणार नाही.