
हिंदुस्थानचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण झाली होती. आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तो रुग्णालयात दाखल झाला आहे, अशी माहिती सचिन तेंडुलकरने सोशल साइटवरून दिली.
सचिन तेंडुलकरने रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये हिंदुस्थानचे नेतृत्व केले होते. या स्पर्धेचे अजिंक्यपदही हिंदुस्थानी संघाने पटकावले. ही स्पर्धा आटपून मुंबईत आल्यानंतर सचिन तेंडुलकरच्या शरीरात कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून आली. यानंतर कोरोना चाचणी केल्यानंतर त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तिथपासून सचिन तेंडुलकर घरामध्येच क्वारंटाइन होता.
आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सचिन तेंडुलकर रुग्णालयात दाखल झाला आहे. याप्रसंगी तो म्हणाला, ‘डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर मी रुग्णालयात दाखल झालो आहे. तसेच सावधगिरीही बाळगत आहे. लवकरच ठीक होऊन घरी जाईन’. दरम्यान, रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये सहभागी झालेल्या सचिन तेंडुलकरसह चार खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे.




























































