सचिनने सरकारी कार्यक्रमांवर बहिष्कार घालावा, शिवसेना नेते संजय राऊत यांचे ट्विट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sanjay-raut-saheb-new

सामना प्रतिनिधी । मुंबई

क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांनी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यासारखा हिरा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला देऊन जगभरात तिरंग्याची शान उंचावली. आचरेकर यांच्या पार्थिवावर मात्र शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले नाहीत. याबद्दल शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त करतानाच सचिनने भविष्यात सरकारी कार्यक्रमांवर बहिष्कार घातला पाहिजे असे रोखठोक मत व्यक्त केले आहे.

संजय राऊत यांनी ‘ट्विटर’वर आपले मत नमूद केले आहे. ‘पद्मश्री’ आणि ‘द्रोणाचार्य’सारख्या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या रमाकांत आचरेकर यांच्यावर राज्य सरकारने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार का केले नाहीत, असा सवालही राऊत यांनी केला. सरकारने आचरेकर यांची उपेक्षा केल्याने आता सचिननेही सरकारी कार्यक्रमांवर बहिष्कार घातला पाहिजे, असे राऊत यांनी नमूद केले आहे.

शासकीय पातळीवर समन्वयाअभावी आचरेकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करता आले नाहीत अशी सारवासारव आता सरकारचे मंत्री करत आहेत. क्रिकेटपटू आणि क्रिकेटप्रेमींमध्ये मात्र तीव्र संताप व्यक्त होत आहे.