आळंदी मंदिरात शालेय विद्यार्थ्यांकडून पालखी सोहळा उत्साहात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आळंदी येथे सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलतर्फे शालेय विद्यार्थ्यांकरिता पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माऊली मंदिरात मुलांनी हरिनामाचा गजर केला. विद्यार्थी वारकरी सांप्रदायाप्रमाणे वेशभूषा करून दिंडीसह पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते.

 या दिंडी पालखी सोहळ्यात प्रशाळेतील मुलांनी वारकरी संप्रदायाप्रमाणे पारंपरिक वेशभूषा केल्या होत्या. संत  ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सोपान देव, संत तुकाराम, संत मुक्ताबाई या संत आणि विठ्ठल-रुक्मिणीमाता यांच्या वेशभूषा विद्यार्थ्यांनी केल्यामुळे त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. यावेळी अभिनव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गणेश गरुड, उपाध्यक्ष सुरेश लोखंडे, संचालक बाबाजी काळे उपस्थित होते.

सह्याद्री शाळेतर्फे पालखी दिंडी संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर ते सह्याद्री स्कूल, अशी लक्षवेधी दिंडी हरिनाम गजरासह निघाली होती. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी अभंग सादर केले तसेच इयत्ता पाचवी व सहावीच्या  विद्यार्थ्यांनी कीर्तन सादरीकरण केले. यावेळी पालखी तयार करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात पालखीच्या विविध प्रतिकृती विद्यार्थ्यांनी तयार केल्या होत्या.

 या कार्यक्रमास अभिनव एज्युकेशन सोसायटीचे संचालक बाबाजी काळेर यांनी विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन केले. अभिनव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गणेश गरुड यांनी प्रबोधनात्मक केलेल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमास विद्यार्थी पालक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यशस्वी नियोजनासाठी मुख्याध्यापिका प्रियांका लांडे, चैताली महाजन, अर्चना शेळके, सुचिता यादव, सोनाली शेळके, पूजा कोरे, कविता नागरगोजे, सुरेखा लोटके, हर्षाली पाटील, आशा मराठे, लक्ष्मी अंडे, पूनम जगताप यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अश्विनी पवार यांनी केले.