साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवाशंकर यांची तडकाफडकी बदली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवाशंकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. तत्काळ पदभार सोडण्याचे आदेश राज्य शासनाने दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या जागेवर नेमकी कोणाची नियुक्ती होते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

गेल्या काही वर्षांपासून शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद वादामध्ये सापडलेले होते. अनेक वेळेला ग्रामस्थांसमवेत सुद्धा त्यांचे वाद विकोपाला जाण्याचा प्रकार याआधी सुद्धा घडलेला आहे. विशेष म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेऊन आपल्या कामाच्या ठसा उमटवण्याचा प्रकार या अगोदरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राहिलेल्या अधिकाऱ्यांनी केला होता व त्यावरूनच वादाची ठिणगी पडली होती.

जेव्हापासून पी. शिवाशंकर यांनी पदभार घेतला होता तेव्हापासूनच त्यांनी काही निर्णय तडका फडकी घेण्यास सुरुवात केली होती. ग्रामस्थ बरोबर त्यांचे म्हणावे असे संबंध राहिले नव्हते. अलीकडच्या काळामध्ये त्यांनी शिर्डी संस्थानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नियम आणले होते. ग्रामस्थांना सुद्धा ओळखपत्र त्यांनी सक्तीचे केले होते. शिर्डी मंदिरामध्ये येताना कोणीही चप्पल घालून यायचे नाही असे कडक नियम त्यांनी केलेले होते त्यावरून ग्रामस्थ व त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक सुद्धा झाली होती.

काही दिवसापूर्वी ग्रामस्थांना ओळखपत्र सक्ती केल्यावर ग्रामस्थांनी विरोध केला होता. दोन दिवसापूर्वी ग्रामस्थांनी मुख्यमंत्री यांची व पालकमंत्री यांची भेट घेतली होती. मुंबईतील भेटीनंतर अचानक बदलीचे आदेश देण्यात आले व त्यांना तात्काळ पदमुक्त करण्यात आले आहे. सामान्य प्रशासनाकडून पदभार दुसऱ्याकडे सोपवून कार्यमुक्त होण्याचे आदेश दिले आहेत.