साईबाबा संस्थानला चिल्लरचे जड झाले ओझे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांना भाविक यथाशक्ती दान देत असतात. यात सोने-चांदीसह रोख रकमेचाही समावेश असतो. मात्र आता हेच दान संस्थान आणि शिर्डीतील बँकांची डोकेदुखी ठरत आहे. वर्षाकाठी संस्थानला साडेतीन कोटी रुपयांची सुटी नाणी प्राप्त होतात. ही नाणी स्वीकारण्यास बँका असमर्थता दर्शवित असल्याने ‘नाण्यांचे जड झाले ओझे’ असे म्हणण्याची वेळ साईबाबा संस्थानवर आली आहे. शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनाला दररोज हजारो भाविक येतात. आपल्या इच्छेनुसार ते दानही करतात. या दानामध्ये दानपेटीत येणाऱया सुटय़ा नाण्यांचा मोठा समावेश असतो. साई संस्थानच्या दानपेटीतील नाण्यांमुळे बँका मेटाकुटीला आल्या आहेत. साईबाबांच्या दानपेटीत दर आठवडय़ाला सरासरी 7 लाख, तर वर्षाला साडेतीन कोटी रुपयांची नाणी जमा होतात, मात्र आता नाणी स्वीकारणे बँकांना अवघड झाले आहे. साईबाबा संस्थानचे शिर्डीतील 12 हून अधिक, तर नाशिकच्या एका राष्ट्रीयीकृत बँकेत खाते आहे. प्रत्येक बँकेकडे दीड ते दोन कोटींची नाणी आजमितीला पडून आहेत.