आयपीएस भाग्यश्री नवटकेंच्या बचावासाठी सकल मराठा मैदानात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । वडवणी

दलित आणि मराठा समाजाच्या वादग्रस्त विधानाने तडकाफडकी बदली झालेल्या माजलगावच्या उपविभागीय अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्या बचावासाठी आता सकल मराठा मैदानात उतरले आहेत. भाग्यश्री नवटके यांची बदली तात्काळ रद्द करून त्यांना पुन्हा माजलगावमध्येच नियुक्ती देण्यात यावी असे निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीने वडवणीचे तहसीलदार यांना देण्यात आले आहे. मागणी मान्य न झाल्यास गुरूवारी वडवणी तालुका कडकडीत बंद करण्याची हाक सकल मराठा समाज संघटनेने केली आहे.

माजलगावच्या उपविभागीय अधिकारी भाग्यश्री नवटके यांची वादग्रस्त व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याने संपूर्ण राज्यामध्ये खळबळ उडाली होती. ‘तुम्ही मराठा आहात म्हणून पाठीवर मारले, दलितांना मी झोडपून काढत असते’, असे विधान त्यांनी केल्याचे त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट होते. या व्हायरल व्हिडिओनंतर दलित संघटनांनी संताप व्यक्त केला होता. त्यांच्या बदलीची आणि बडतर्फीची मागणी करण्यात आली होती. यानंतर उपविभागीय अधिकारी भाग्यश्री नवटके यांची तडकाफडकी संभाजीनगरला बदली करण्यात आली होती. बदलीनंतर आता भाग्यश्री नवटके यांच्या बचावासाठी सकल मराठा समाज रस्त्यावर उतरत आहे. वडवणी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देवून भाग्यश्री नवटके यांची बदली रद्द करून त्यांना पुन्हा माजलगावला नियुक्त करण्यात यावे अशी मागणी करत मागणी मान्य न झाल्यास सकल मराठा समाजाच्या वतीने गुरूवारी वडवणी तालुका कडकडीत बंदचा इशारा देण्यात आला आहे.