
सामना प्रतिनिधी । नागपूर
वाळू तस्करांच्या ट्रकचा पाठलाग करणारे अमरावतीच्या धामणगाव तहसीलदारांच्या शासकीय वहनाला वाळू माफियांच्या ट्रकने जोरदार धडक देऊन उडवले. यात तहसीलदार, वाहनचालक आणि एक कर्मचारी गंभीर जखमी झालाय. ही घटना सोमवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमाराला सातेफळा फाट्यानजीक घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, धामणगाव चे तहसीलदार अभिजीत नाईक यांना चांदूर-रेल्वेचे एसडीओ म्हणून प्रभार देण्यात आलाय. सोमवारी नाईक आपल्या शासकीय गाडीने (एम.एच.27 ए.ए. 503) चांदुर रेल्वेकडे एसडीओचा प्रभार स्वीकारण्यासाठी चालले होते. दरम्यान सातेफळ फाट्याजवळ त्यांना वाळूचा अर्धवट भरलेला ट्रक (एम एच 27 बीएक्स 290 ) दिसला. त्यामुळे या कर्तव्यदक्ष अधिका-याने चौकशीसाठी चालकाला संबंधित ट्रकला थांबण्यासाठी हात दाखविला. त्यावेळी वाळू सत्करांनी ट्रक थेट तहसीलदारांच्या गाडीवर ट्रक चढविला. यात तहसीलदार, त्यांचा वाहनचालक आणि अन्य एक कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
































































