
हिंदू संस्कृतीतील सर्वांत मोठा आणि प्रकाशोत्सव असलेला दिवाळी सण प्रत्येकजण आपआपल्या ऐपतीप्रमाणे साजरा करतो. श्रीमंत, मध्यमवर्गीय लोक मॉल, कपड्यांच्या दुकानांत जाऊन कपडे खरेदी करतात. मात्र, गोरगरीब, कष्टकरी जुन्या बाजारात मिळणाऱ्य़ा कपड्यांवरच समाधान मानत आनंदोत्सव साजरा करीत सण साजरा करतात. मिरज शहरात प्रत्येक बुधवारी भरणारा ‘जनता बाजार’ यासाठी प्रसिद्ध आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या बाजारात कपडेखरेदीसाठी गोरगरिबांची मोठी धांदल सुरू होती.
दिवाळी सणासाठी प्रत्येकजण आपआपल्या परीने खरेदी करतो. गरीब-कष्टकरीवर्गातील लोकांना स्वतःसाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी कपडे घेण्याची इच्छा असते. मग ते अशा वेळी धाव घेतात ते रस्त्यावर मिळणाऱ्य़ा स्वस्तातल्या कपड्यांकडे. फुटपाथवर मांडण्यात आलेले स्टॉल्स हे त्यांचे खास विशेष आकर्षण असते. याचबरोबर जुन्या बाजारात आलेल्या कपड्यांमध्येही काहीजण आपली दिवाळी साजरी करतात.
मिरज शहरातील मुख्य पोलीस ठाण्यामागे भरणारा जुना कापड बाजार गेल्या अनेक वर्षांपासून यासाठी प्रसिद्ध आहे. प्रत्येक बुधवारी हा बाजार भरतो. पण दिवाळीच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्य़ा बुधवारी मात्र तेथे गोरगरिबांची खरेदीसाठी मोठी झुंबड उडते. अशी झुंबड बुधवारी पाहायला मिळाली. कपड्यांच्या ढिगातून आपल्या अंगावर कोणता कपडा चांगला दिसेल, याची चाचपणी करीत अनेकजण जुन्या कपड्यांचा ढीग उपसत होते. रस्त्यावरच व्यापारी आपले कापड दुकान थाटतात. हे व्यापारी मोठमोठय़ा शहरांत फिरून भांडी आणि अन्य साहित्याच्या बदल्यात नागरिकांकडून जुने कपडे घेतात आणि त्यांपैकी चांगल्या अवस्थेतील कपडे या बाजारात विकण्यासाठी आणतात.
कोणत्याही ब्रॅण्डचा कपडा येथे मिळण्याची हमखास गॅरंटी. विविध प्रकारच्या साड्या, जीन्स, टी-शर्ट्स, सफारी, सलवार-कुर्ता, पंजाबी ड्रेस, टॉप्स असे हवे ते कपडे मिळतात. येथे स्वस्तामध्ये मस्त माल मिळत असला, तरी ग्राहक घासाघीस करतोच! साड्यांचे शेकडो नमुने दाखवून झाले तरीही ‘आणखी काही नवीन आहे का?’ अशी विचारणा करीत महिला संबंधित महिला व्यापाऱ्य़ांना घाम फोडत होत्या.
‘जनता बाजार’मधील कपड्यांचे दर
शर्ट 10 ते 15 रुपये, पॅण्ट 20 ते 30 रुपये, जीन्स पॅण्ट 40 ते 50 रुपये, धोतर 20 ते 25 रुपये, सफारी, सलवार-कुर्ता, पंजाबी ड्रेस, टॉप्स 20 ते 30 रुपये, साडी 20 ते 40 रुपये, लहान मुलांचे कपडे 10, 15 ते 20 रुपये.
गावोगावी फिरून व्यवसाय
मिरज, सांगली, तासगाव, कवठेमहांकाळ, जत, खानापूर, आटपाडी, पलूस, कडेगाव, ईश्वरपूर, शिराळा, कोल्हापूर जिल्ह्यांतील शिरोळ, जयसिंगपूर, इचलकरंजी आदी भागांतील गावोगावी जाऊन नवीन ऍल्युमिनियची भांडी देऊन त्याबदल्यात पैशांऐवजी घरातील जुन्या साड्या, कपडे घेतो. हा व्यवसाय करणारे सुमारे शंभर ते सव्वाशेजण आहेत. या व्यवसायामध्ये महिलांचे प्रमाण जास्त आहे. या व्यवसायात फार फायदा मिळत नसला, तरी घरसंसार चालविण्यासाठी हातभार लावता येत असल्याचे गेली 45 वर्षे जुने कपडे विकण्याचा व्यवसाय करणाऱ्य़ा सोनाबाई वासुदेव यांनी सांगितले.
पूर्वी पाच ते दहा रुपयांत दिवाळीत सर्व कुटुंबीयांची कपडेखरेदी व्हायची. परंतु आता महागाई वाढली आहे. नवीन कपडे खरेदी करण्याची इच्छा असायची; पण परिस्थितीअभावी जुन्या बाजारातील कपडे खरेदी करून दिवाळी साजरी केली जाते. अवघ्या दोनशे ते तीनशे रुपयांत घरादाराची दिवाळीसाठी कपडेखरेदी होते.’- कमल शिंदे, जुने कपडे व्यावसायिक.



























































