संगमनेरमध्ये 100 किलो प्लॅस्टिक जप्त; 45 हजारांचा दंड वसूल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्लॅस्टिकबंदी आदेश धुडकावत प्लॅस्टिक विक्री करणाऱया संगमनेर शहरातील विक्रेत्यांवर नगरपरिषदेच्या प्लॅस्टिक विरोधी पथकाने कारवाई केली. या कारवाईत तब्बल 45 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला असून, 100 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, बंदी असलेल्या प्लॅस्टिकची विक्री न करण्याचे आवाहन प्रशासक डॉ. शशिकांत मंगरूळे आणि मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी केले आहे.

प्लॅस्टिक बंदी आदेशाची शहरातील विक्रेत्यांकडून पायमल्ली सुरू होती. बंदी असलेले प्लॅस्टिक पिशव्यांची सर्रासपणे विक्री केली जात असल्याने दीपावलीच्या पार्श्वभूमीवर सक्रिय झालेल्या नगर परिषदेच्या प्लॅस्टिक विरोधी पथकाने शहराच्या विविध भागांत दोन दिवस ही कारवाई केली. काही विक्रेत्यांना कारवाईचा सुगावा लागल्याने त्यांनी बंदी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्या गायब केल्या.

प्रशासक डॉ. मंगरुळे आणि मुख्याधिकारी वाघ यांनी प्लॅस्टिक विक्री करणाऱयांवर कारवाईचे आदेश दिले होते. पथकाने तब्बल अर्ध्या लाखाचा दंड वसूल करत 100 किलो प्लॅस्टिक जप्त केले आहे. मुख्याधिकारी वाघ यांनी नेमलेल्या पथकात आरोग्य विभागाचे अश्विन पुंड, अरविंद गुजर, चंद्रकांत ढोले, जयराम मंडलिक, अजय जेधे, मनोज जेधे, सतीश बुरुंगले, संजय जेधे यांचा सहभाग आहे.

पथकाने संगमनेर शहरातील चंद्रशेखर चौक, नेहरू चौक, बसस्थानक परिसर, नवीन नगर रोड या भागातील प्लॅस्टिक विक्रेत्यांच्या दुकानांच्या तपासणीत बंदी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्या आणि प्लॅस्टिक साहित्याची विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले. पथकाने तब्बल 45 हजार रुपयांचा दंड वसूल करत 100 किलो प्लॅस्टिक ही ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे प्लॅस्टिक विक्रेत्यांमध्ये घबराट निर्माण झाली.

एकाच भागावर कारवाईचा बडगा

z संगमनेर नगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली तर ती शहरातील एका ठरावीक भागातच केली जाते. बाकीच्यांना रान मोकळे करून दिले जात असल्याचा आरोप व्यापारी, विक्रेत्यांनी केला आहे.