सांगली जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रचाराला गती; नेते, उमेदवारांच्या पायाला भिंगरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या प्रचाराला गती आली असून, पॅनेलचे नेते आणि उमेदवारांनी पायाला भिंगरी लावत व वैयक्तिक गाठीभेटीच्या माध्यमातून प्रचाराचा धडाका लावला आहे.

सांगली जिल्ह्यातील हजारो शेतकरी व उद्योग व्यावसायिकांची अर्थवाहिनी असलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी निवडणूक सध्या सुरू असून, 21 रोजी मतदान होणार आहे. यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत महाविकास आघाडीच्या माध्यमातून सहकार पॅनेलची स्थापना केली आहे. तर, भाजपने शेतकरी विकास पॅनेलच्या माध्यमातून जिल्हा बँकेच्या निवडणूक मैदानात उडी घेतली आहे. महाविकास आघाडीच्या पॅनेलचे उमेदवार आमदार मानसिंग नाईक, आमदार अनिल बाबर आणि महेंद्र लाड हे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने आता 18 जागांसाठी 39 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

महाविकास आघाडीकडून पालकमंत्री जयंत पाटील, सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्यासह तिन्ही पक्षांची जिल्हाध्यक्ष, आमदार, पदाधिकारी आणि उमेदवारांनी पायाला भिंगरी लावली आहे. भाजपकडून जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, माजी आमदार विलासराव जगताप, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार दिनकर पाटील आदींनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. सोसायटी गटात मोठी चुरस निर्माण झाल्याने या जागांसाठी दोन्ही पॅनेलच्या नेत्यांनी विशेष लक्ष
दिले आहे.

जत, आटपाडी या दोन सोसायटी गटात काटय़ाची टक्कर होण्याची चर्चा आहे. याशिवाय ओबीसी, मजूर, पतसंस्था या गटात ही मोठी चुरस निर्माण झाली आहे.

मतदारांची पळवापळवी जोरात

मर्यादित मतदार संख्या मुळे मतदारसंघातील मतदारांची पळापळी जोरात सुरू आहे. आटपाडीसारख्या मतदारसंघात दिवाळीपूर्वीच मतदारांना पकडण्यात आले आहे. तर, इतर तालुक्यात असे प्रकार सध्या सुरू झाले आहेत.