
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी चिन्ह वाटपानंतर निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली. सोसायटी गटातील निवडणूक चुरशीची होत असून, मातब्बर नेते या गटातून निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष आहे. सोसायटी गटाच्या दहा जागांपैकी तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित सातपैकी वाळवा, कडेगाव व कवठेमहांकाळ वगळता उर्वरित जत, आटपाडी, तासगाव व मिरजेत जोरदार चुरस होणार आहे.
जिल्हा बँकेसाठी सोसायटी गटाच्या दहा जागा आहेत. दहा तालुक्यांतील दहा जागांवर तालुक्याचे प्रमुख नेते, आमदार यांचे कायम वर्चस्व राहिले आहे. अर्ज माघारीच्या दिवशीच शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक, खानापूरचे आमदार अनिल बाबर व पलूसचे महेंद्र लाड हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता सोसायटी गटात केवळ सात जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये कडेगावमधून आमदार मोहनराव कदम, वाळव्यातून बँकेचे विद्यमान अध्यक्ष दिलीपतात्या पाटील व कवठेमहांकाळमधून माजी मंत्री अजितराव घोरपडे निवडणूक लढवत आहेत. या तीनही ठिकाणी तुल्यबळ उमेदवार दिसत नाहीत. त्यामुळे या तिन्ही तालुक्यांतील सोसायटी गटाची निवडणूक एकतर्फी होणार हे स्पष्ट झाले आहे; मात्र उर्वरित चार गटांमध्ये मात्र मोठी चुरस होणार आहे.
आटपाडी, जत या दोन तालुक्यांत चुरस लागली आहे. आटपाडी मतदारसंघ तर आधीपासून गाजत आहे. भाजपचे राजेंद्र आण्णा देशमुख व महाविकास आघाडीचे तानाजी पाटील यांची लढत आहे. जतमध्ये महाविकास आघाडीच्या आमदार विक्रम सावंत यांच्यासमोर भाजपच्या प्रकाश जमदाडेंचे आव्हान आहे. तेथे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार सावंत यांच्यासमोर सर्वपक्षीय एकत्र आल्याची चर्चा आहे. त्यामुळे सावंत यांची धाकधूक वाढली असून, धावपळ होणार आहे. मिरजेत विशाल पाटील वर्षापासून तयारीत आहेत. तासगावमध्ये विद्यमान संचालक डॉ. प्रताप पाटील अपक्ष निवडणूक लढवत असून, त्यांना महाविकास आघाडीचे बी. एस. पाटील, तर भाजपचे सुनील जाधव यांचे आव्हान आहे.
महाविकासला ‘कपबशी’, तर भाजपला ‘विमान’ चिन्ह
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात आले. महाआघाडीच्या सहकार विकास पॅनलला कपबशी, तर भाजपच्या शेतकरी विकास पॅनलला विमान चिन्ह देण्यात आले. तसेच इतर 12 उमेदवारांना अन्य चिन्हांचे वाटप आज करण्यात आले. चिन्ह वाटपानंतर उमेदवारांनी तत्काळ प्रचारास प्रारंभ केला आहे. बँकेच्या 21 जागांपैकी तीन जागा बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित 18 जागांसाठी 46 उमेदवार रिंगणात आहेत.


























































