
सांगली जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून लम्पीस्कीनचा प्रादुर्भाव अद्यापही थांबायला तयार नसून, मंगळवारी उद्रेक झाला. एकाच दिवसात तब्बल 87 जनावरांना संसर्ग झाला, तर 12 जनावरांचा मृत्यू झाला आहे. सद्यःस्थितीत 838 जनावरांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. आत्तापर्यंत 3 लाख 37 हजार 441 जनावरांना ‘लम्पी’ची लस टोचण्यात आली आहे.
जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून लम्पीस्कीनचा संसर्ग सुरू झाला. लम्पीला रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. तरी अद्यापही लम्पी आटोक्यात येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मंगळवारी नव्याने तब्बल 87 जनावरांना बाधा झाल्याचे आढळून आले. आत्तापर्यंत जिल्ह्यात 1 हजार 345 जनावरांना लम्पीचा संसर्ग झाला असून, अद्यापि 838 जनावरांवर उपचार सुरूच आहेत. या रोगांमुळे आत्तापर्यंत 82 जनावरांचा मृत्यू झाला आहे, तर 425 जनावरे आजारातून बरी झालेली आहेत.
लम्पीस्कीनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात 3 लाख 37 हजार 441 जनावरांचे लसीकरण झाले आहे. खासगी दूध संघाकडूनही जनावरांचे लसीकरण करण्यात आले. याशिवाय जिल्हा प्रशासनाकडे 3 लाख 3 हजार शंभर लसीचे डोस प्राप्त झाले होते. त्यातून लसीकरण करण्यात आले. लम्पीची साथ आटोक्यात येत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
नगर जिल्ह्यात चार हजार जनावरांवर उपचार सुरू
नगर जिल्ह्यात आतापर्यंत 10 हजार 279 जनावरांना लम्पी चर्मरोगाची लागण झालेली आहे. यातील 5 हजार 779 जनावरांवर उपचार करून त्यांना लम्पीमुक्त करण्यात आले आहे, तर 3 हजार 925 जनावरांवर अद्याप उपचार सुरू असून, 5 हजार 75 जनावरांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी नव्याने 453 लम्पी संसर्ग झालेली जनावरे समोर आली असून, 32 जनावरांचा मृत्यू झालेला आहे. पशुसंवर्धन विभागाकडून 931 गावांत फॉगिंग करून लम्पीला रोखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. 218 गावांत लम्पीचे सक्रिय रुग्ण असून, या गावाच्या पाच किलोमीटरच्या परिघात 1 हजार 127 गावे येत आहेत. त्याठिकाणी पशुसंवर्धन विभाग सर्व गोवर्गीय जनावरांचे लसीकरण करीत आहे.



























































