
सांगलीतील दरोडय़ाचे दोन गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. सांगलीतील दरोडा आंतरराज्य टोळीने घातल्याचे समोर आले असून, या दरोडय़ातील सुमारे पाच लाख रुपयांचा सोन्याचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अनिल ऊर्फ अन्या युवराज पिंपळे (वय 49, अशोकनगर, ता. श्रीरामपूर), तुकाराम भीमराव घोरवडे (वय 54, उंडे मातापूर, ता. श्रीरामपूर, जि. नगर) , दाजी धनराज सोळंके (वय 36, रा. हरसूल, लासूर, ता. गंगापूर, जि. संभाजीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
सांगलीतील कर्नाळ रोडवरील दत्तनगरमध्ये 23 डिसेंबर रोजी मध्यरात्री आशीष चिंचवाडे यांच्या घरावर दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी चिंचवाडे यांचे हात-पाय बांधून घरातील दागिने आणि दोन लाखांची रोकड लुटून पोबारा केला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि शहर पोलिसांनी यातील तीन दरोडेखोरांना अटक केली.
संबंधित गुन्हेगार हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. रेल्वेने प्रवास करताना ज्या शहरात उतरतील, त्या ठिकाणी फिरून दरोडा घालण्यासाठीचे ठिकाण निश्चित करतात. त्यानंतर शस्त्र्ाांचा धाक दाखवून दरोडा घालून पुन्हा रेल्वेने पसार होतात. अटकेत असलेले पिंपळे आणि घोरवडे यांच्यावर छत्तीसगडमधील सीटी कोतवालीसह चार, नागपूरमध्ये एक असे दरोडय़ाचे गुन्हे दाखल आहेत. मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान या राज्यांतही या टोळीने गुन्हे केले असल्याचे समोर येत आहे. या टोळीतील आणखी सहाजण फरार आहेत.
मोबाईलमुळे कवठेमहांकाळमधील चोरी उघड
z कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची गावानजीक मध्यरात्री चारचाकीवर दगडफेक करून दरोडा घातल्याची घटना 30 डिसेंबर रोजी घडली होती. दरोडेखोरांच्या हल्ल्यात माधवी जनार्दन जानकर आणि विकास हेकडे हे जखमी झाले होते. दरोडेखोरांनी महिलांच्या अंगावरील दागिने, रोकड जबरदस्तीने काढून घेऊन पलायन केले होते. या गुह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे, गुन्हे अन्वेषण आणि कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या पथकांनी केला. या गुह्यातील जलवा ऊर्फ त्रिदेव सिसफुल भोसले (वय 42, रा. लिंगणूर, ता. मिरज) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या आणखी चार साथीदारांचा शोध सुरू आहे. भोसले याच्याकडे त्या गुह्यातील मोबाईल सापडला असल्याने त्याच्या टोळीनेच हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले आहे.



























































