
तळ्यात आंघोळीसाठी गेलेल्या चार भावंडांचा तुटलेल्या वीजवाहक तारेचा शॉक बसून मृत्यू झाला होता. आज मृत बालकांच्या वडिलांनी फिर्याद दिल्याने महावितरणच्या तीनजणांवर गुन्हा दाखल झाला असून, एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
भालेराव (पूर्ण नाव नाही), जालिंदर लेंडे, साहेबराव शिवाजी लेंडे (रा. खंदरमाळ) अशी आरोपींची नावे असून, भालेराव याला अटक करण्यात आली आहे. अरुण हौशीराम बर्डे (रा. वांदरकडा, खंदरमाळवाडी, ता. संगमनेर) यांनी फिर्याद दिली आहे.
संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडीच्या वांदरकडा येथे तळ्यात आंघोळीसाठी गेलेल्या चार भावंडांचा तुटलेल्या वीजवाहक तारेचा शॉक बसून मृत्यू झाला होता. घटनास्थळी विद्युत पोलवरील वीजवाहक तार तुटलेली असल्याने अरुण बर्डे यांनी डीपीमधून वीजपुरवठा बंद केला होता. वीज वितरण कंपनीत प्रत्यक्ष जाऊन तार तुटल्याची तक्रारही केली होती. मात्र, वायरमन भालेराव यांनी तार दुरुस्त केली नाही. तसेच जालिंदर लेंडे व साहेबराव लेंडे यांनी डीपीतून वीजप्रवाह पुन्हा सुरू केला होता. त्यामुळे या चारही बालकांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक सुनील पाटील तपास करीत आहेत.
दरम्यान, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मृत बालकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले असून, मृतांच्या नातेवाईकांना 11 लाखांची मदत जाहीर केली.





























































