देशात सक्षम विरोधी पक्ष नसेल तर भाजपला कसे रोखणार! दिल्लीत यूपीए-2 तयार करण्याचा प्रयत्न होतोय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात एक सक्षम विरोधी पक्ष निर्माण व्हायला हवा. देशात उत्तम विरोधी पक्ष तयार झाला नाही तर भाजपला कसे रोखणार, असा सवाल शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी केला. काँग्रेस हा देशातील प्रमुख विरोधी पक्ष आहे. काँग्रेसशिवाय यूपीएचे अस्तित्व असूच शकत नाही, पण  दिल्लीत यूपीए-2 तयार करण्याचा प्रयत्न होतोय हे समजून घ्या, असेही खासदार राऊत यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष करा अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली. यावर महाराष्ट्रातील काही काँग्रेस नेत्यांनी केलेल्या टिप्पणीकडे पत्रकारांनी राऊत यांचे लक्ष वेधले. यावेळी ते म्हणाले, आजवर अनेक आघाडय़ांची नाटके झाली, पण काहीच निष्पन्न झाले नाही. आताची आहे ही आघाडी मजबूतच व्हायला हवी. पण दिल्लीत यूपीए-2 ची स्थापना करण्याच्या हालचाली सुरू आहेत. जर असे घडले तर सध्याच्या यूपीएचे महत्त्व कमी होईल आणि मग विरोधी पक्षांच्या हातात काहीही उरणार नाही.

यूपीएचा विषय हा राज्याचा विषय नसला तरी देशाचा नक्कीच आहे. शरद पवार हे देशाचे नेते आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे काय आहेत ते सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांनी हे समजून घ्यावे. यावर काही बोलू नये. प्रत्येकाने बोललेच पाहिजे असे काही नाही, असा टोलाही खासदार राऊत यांनी लगावला.

शरद पवार आणि माझेही फोन टॅप

फोन टॅपिंग प्रकरणात सरकारने वेळीच कारवाई केली असती तर विरोधी पक्षनेते दिल्लीला आले नसते, असे राऊत म्हणाले. ठाकरे सरकार येऊ नये म्हणून रश्मी शुक्ला यांनी अनेक आमदारांना धमक्या दिल्या. खरे तर प्रशासनाशी आकसाने वागू नये. पण असले अस्तनीतले साप, निखारे असतात त्यांना वेळीच दूर करणे गरजेचे आहे, असे सांगतानाच खासदार संजय राऊत यांनी शरद पवार आणि माझेही फोन टॅप होत होते, हे गंभीर आहे, असेही सांगितले.