शिवसेना महाराष्ट्रात 23 जागाच लढवणार, पक्षाची ठाम भूमिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रात शिवसेना लोकसभेच्या 23 जागाच लढवणार आहे. ही पक्षाची ठाम भूमिका आहे, असे शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज स्पष्ट शब्दांत सांगितले.

शिवसेनेने गेल्या लोकसभा निवडणुकीत 23 जागा लढवल्या होत्या आणि त्यापैकी 18 जागी आमचा विजय झाला. त्याच सूत्राप्रमाणे यावेळीही आम्ही 23 जागा लढणार आहोत. याबाबत महाराष्ट्रातील काँग्रेस नेते काही टिपण्णी करत असतील तर त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. राष्ट्रीय पक्षाचे लहान-सहान निर्णयही दिल्लीत घेतले जातात.

त्यामुळेच आम्ही दिल्लीत सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी याविषयी बोललो आहोत. महाराष्ट्रातील जागावाटपाची चर्चा दिल्लीत करणे सोयीचे ठरेल, अशी भूमिका आम्ही मांडली असून खरगे यांनी आमच्या भूमिकेचे स्वागत केले आहे, असेही संजय राऊत यांनी नमूद केले.

आमचा पक्ष फुटला की नाही, हे काँग्रेस ठरवू शकत नाही. आमदार आणि खासदार निघून जातात. पण मतदार हा आमच्या बरोबर आहे, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. काँग्रेसकडे राज्यात एकतरी जिंकलेली जागा आहे का? काँग्रेसला शून्यातून सुरुवात करायची आहे. तरीही आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करायला तयार आहोत, असेही राऊत म्हणाले.

‘वंचित’ला ‘इंडिया’त घ्यावे

वंचित बहुजन आघाडीबाबत जशी शरद पवार यांनी काँग्रेस नेतृत्वाशी चर्चा केली, तशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही चर्चा केली आहे. शिवसेना आणि वंचित यांच्या आघाडीचा निर्णय आधीच झालेला आहे. पण त्यांनी महाविकास आघाडी आणि ‘इंडिया’ आघाडीत असावे, अशी आमची भूमिका आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

काँग्रेस समन्वय समितीची आज बैठक

जागावाटपाबाबत समन्वय समितीची उद्या बैठक होणार आहे. त्यानंतर समन्वय समिती महाराष्ट्रातील नेत्यांशी चर्चा करेल. जागावाटपाबाबत सध्यातरी जाहीर भाष्य करायचे नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.