मध्यमवर्गीयांनी आणि सुशिक्षितांनी भाजपला नापास केलंय, निवडणुकीच्या निकालावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपचा दारुण पराभव करत राज्यातील सत्ताधाऱ्यांना चांगलाच दणका दिला. मविआचे सुधाकर अडबोले यांनी नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजप समर्थीत नागो गाणार यांना पराभवाची धूळ चारली. यामुळे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना जबरदस्त धक्का बसला आहे, तर अमरावती पदवीधरमध्ये कॉँग्रेसचे धीरज लिंगाडे आघाडीवर असून ते भाजपचे विद्यमान आमदार डॉ. रणजित पाटील यांचा पराभव करून निवडणुकीत बाजी मारण्याची शक्यता आहे. या निकालांबद्दल बोलत असताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले की, ‘हा निकाल हेच सांगतोय की महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय आणि उच्चमध्यमवर्गीय, सुशिक्षित आणि पदवीधर यांनी भाजप आणि त्यांच्या सरकारचा पूर्ण पराभव केलाय, त्यांना नाकारलंय आणि नापास केलं आहे.’

दिल्लीमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, भाजप 5 पैकी फक्त 1 जागाच जिंकू शकला. त्याही ठिकाणचा उमेदवार हा उधार उसनवारीचा होता. ते पुढे म्हणाले की, ‘शिक्षक आणि पदवीधर हा समाजात आणि राजकारणात एक महत्त्वाचा घटक असतो. त्यांनी भाजपला नाकारलं आहे, हे त्यांनी स्वीकारलं पाहिजे आणि फालतू खुलासे करू नयेत. याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रात जे चालू आहे ते लोकांना मान्य नाही आणि लोकं निवडणुकांची वाट पाहात आहेत.’

नागपूरमध्ये शिवसेनेचा उमेदवार जिंकू शकला असता मात्र महाविकास आघाडी म्हणून सगळ्यांनी सुधाकर अडबोले यांच्यामागे उभे राहण्याचा निर्णय घेतला होता. महाविकास आघाडीला मजबुतीने पुढे न्यायची असल्याचे सगळ्यांनी ठरवले असल्याने शिवसेनेने आपला उमेदवार मागे घेतला होता. नाशिकमध्ये सत्यजीत तांबे हे काँग्रेससोबतच राहतील याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

शिवसेना पक्ष, पक्षाचे नेते यांच्यावर खोटेनाटे आरोप करणाऱ्या भाजप नेत्यांविरोधात आपण खटला दाखल करणार असल्याचे राऊत यांनी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. शिवसेनेचे बहुतेक सगळे लोकं ज्यांच्याविरोधात खोटे आरोप होत आहे ते सगळे आता या लोकांविरोधात खटले दाखल करत आहेत, असे राऊत यांनी सांगितले.