उदयनिधी स्टॅलिन यांचा शिरच्छेद करणाऱ्याला 10 कोटी देणार, अयोध्येच्या संत परमहंस यांची घोषणा

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह विधान करून वाद ओढवून घेतला आहे. सनातन धर्माची तुलना डेंग्यु-मलेरियासारख्या आजारांशी करताना त्यांनी सनातन धर्म संपवायला हवा, असं विधान केलं होतं. त्या विधानावरून देशभरातून संतापाची लाट उसळलेली पाहायला मिळत आहे.

उदयनिधी स्टॅलिन यांचा शिरच्छेद करणाऱ्याला 10 कोटी रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा अयोध्येचे संत परमहंस यांनी केली आहे. जर कुणी मारू शकलं नाही तर स्वतः स्टॅलिन यांना शोधून ठार मारेन, अशी घोषणाही परमहंस यांनी केली आहे. जर 10 कोटी ही रक्कम कमी वाटत असेल तर मी ती वाढवेन, पण सनातन धर्माचा अपमान सहन केला जाणार नाही. देशात आतापर्यंत जो काही विकास झाला आहे, तो सनातन धर्मामुळे झाला आहे. त्यामुळे स्टॅलिन यांनी आपल्या विधानावर माफी मागावी. त्यांनी देशातील 100 कोटी लोकांच्या भावना दुखावल्या आहेत, असं परमहंस आचार्य यांनी म्हटलं आहे.

उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यु, मलेरिया यासारख्या आजारांशी केल्याने हा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी केलेल्या विधानानुसार, सनातन धर्माचा नुसता विरोध करून चालणार नाही, तर सनातन धर्माला समाप्त करायला हवं. सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समानतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींचा विरोध केला जाऊ शकत नाही. त्यांना संपवावचं लागेल. आपण, डेंग्यू, मच्छर, मलेरिया किंवा कोरोनाचा विरोध करू शकत नाही. आपल्याला त्याला संपवावं लागतं, तसंच आपल्याला सनातन धर्म संपवावा लागेल, असं वक्तव्य उदयनिधी स्टालिन यांनी केलं होतं.