गावात 50 सीसीटीव्ही कॅमेरे बसवणाऱ्या सरपंचाच्याच घरी चोरी, दहिफळ गावातील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धाराशिवच्या कळंब तालुक्यातील दहिफळ गावात सुरक्षेसाठी 50 सीसीटीव्ही कॅमेरे बसवणाऱ्या सरपंचाच्याच घरी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. गावाला जोडणाऱ्या लहान मोठ्या सर्वच रस्त्यावर तसेच ग्रामपंचायत, सरकारी दवाखाना, शाळा, मुख्य प्रवेशद्वार असलेल्या वेशीवर आदी ठिकाणी शिवसेनेचे. सरपंच चरणेश्वर पाटील यांनी 50 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. मात्र चोरट्यांनी सरपंचाच्याच घरी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या वायर तोडुन घराच्या पाठीमागील घराचा लोखंडी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. परंतु लोक जागे झाल्याने चोरट्यांचा हा प्रयत्न अयशस्वी झाला.

गावातील चोऱ्या, दरोडे, रस्त्यावर कचरा टाकणारे व इतर गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी शिवसेनेचे सरपंच चरणेश्वर पाटील यांनी गावातील सर्व महत्वाच्या ठिकाणी 50 सीसीटीव्ही बसविले. आता गावकऱ्यांना रात्री घरी सुखाची झोप मिळणार होती. दहिफळ येथे शाळेतील साहित्य व संगणक चोरी तसेच मागील काही महिन्यांमध्ये दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत गावातील मुख्य रस्त्यावरील घरावर दरोडे टाकून लाखो रुपयांची केलेली लूट व पोलिसांना कसलाही लागत नसलेला सुगावा यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. यामुळे रात्रभर नागरिक जागे राहत होते. तसेच जिल्हा परिषदेची शाळा व इतर चोरी दरोडे रोखण्यासाठी गावातील तरुणांचे दक्षता पथक कार्यरत असून देखील चोऱ्या दरोड्यांच्या घटना आवरणे मोठे जिकरीचे झाले होते.

सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी गावचे सरपंच चरणेश्वर पाटील यांनी संकल्प करून सीसीटीव्ही कॅमेरे बसवून गावचे संरक्षण करण्याचा निर्णय घेतला. मात्र पाटील हे दसरा मेळाव्यासाठी मुंबई येथे गेले असल्याची कुजबुज लागली आण चोरट्यांनी त्यांचेच घर बुधवारी मध्यरात्री सिसिटिव्हीच्या वायर तोडुन घराचा दरवाजा तोडुन चोरी करण्याच्या प्रयत्नात असतानाच आवाज झाल्याने चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. या घटनेमुळे पोलीसांपुढे मोठे आव्हान उभे राहीले असुन लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.