
झाडावरील आग्या मोहोळ पाडण्याची पैज एका बालकाच्या जीवावर बेतल्याची घटना सातारा तालुक्यातील हिरापूर (नुने फाटा) येथे घडली. यावेळी मधमाशांनी चढवलेल्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. संजय राम जाधव (वय 7, सध्या रा. हिरापूर, नुने फाटा, मूळ रा. पेण, ता. माणगाव, जि. रायगड) असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
जाधव कुटुंबीय रायगडहून काही महिन्यांपूर्वी हिरापूर येथे कामानिमित्त आले आहे. राम जाधव हे वीटभट्टीवर मजुरी करतात. आई-वडील कामात मग्न असताना त्यांचा मुलगा संजय व त्याचे मित्र सूरज व करण हे रानात बागडत होते. त्यावेळी त्यांना एका झाडावर आग्या मोहोळ दिसले. बालसुलभ स्वभावामुळे हे मोहोळ दगडाने पहिलं कोण पाडतं, अशी त्यांच्यात पैज लागली. त्याप्रमाणे तिघेही आग्या मोहोळच्या दिशेने दगड भिरकावू लागले.
त्यातील एक दगड आग्या मोहोळाला लागला आणि मोहोळ उठले. मधमाशांनी चिमुकल्या मुलांवर हल्ला केला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे तिघेही मुले भांबावून गेली. आरडाओरड करीत मुलांनी घराकडे धाव घेतली. सर्वात जास्त मधमाशा संजयला चावल्या. अशा अवस्थेतही तो घरी आला. घरच्यांनी त्यांच्या संपूर्ण अंगावर हळद लावली. मात्र, त्याच्या अंगावर सूज येऊ लागली. त्यामुळे त्यांनी संजयला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रात्रभर त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, पहाटे त्याचा मृत्यू झाला.
शवविच्छेदनानंतर मुलाचा मृतदेह वडिलांच्या ताब्यात देण्यात आला. सातारा शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, हवालदार महेंद्र पाटोळे तपास करीत आहेत.






























































