साताऱ्यातील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया अखेर सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत ऑनलाइन बदल्यांकडे शिक्षकांचे लक्ष लागून होते. त्यानुसार राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून वेळापत्रक जाहीर झाले आहे. दि. 21 ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाली आहे. बदलीची ही प्रक्रिया तब्बल 45 दिवस सुरू राहणार आहे. बदलीपात्र शिक्षकांच्या हाती 25 डिसेंबरला बदलीचे आदेश सोपवले जातील.

सातारा जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षकांची संख्या सुमारे दहा हजारांवर आहे. आंतर जिल्हा शिक्षकांच्या बदल्या झाल्यानंतर जिल्ह्यांतर्गत बदल्यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे लक्ष लागून होते. मात्र, शासनाकडून बदल्यांचे वेळापत्रक जाहीर झाले नव्हते. नुकतेच शासनाकडून जिल्ह्यांतर्गत बदल्यांचे वेळापत्रक निश्चित झाले आहे. वेळापत्रकानुसार सर्वप्रथम जिल्ह्यातील अवघड क्षेत्रांची निश्चिती केली जाणार आहे. सुमारे दीड ते पावणेदोन महिने ही प्रक्रिया सुरू राहील. 25 डिसेंबरला बदलीपात्र शिक्षकांच्या हातात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत बदलीचे आदेश मिळतील.

26 व 28 या दोन दिवसांत संवर्ग एक व दोनचे फॉर्म भरून घेतले जातील. 29 ला बदलीपात्र आणि बदली अधिकारपात्र याद्या पुन्हा जाहीर करण्यात येतील. 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत याद्यांच्या अनुषंगाने काही आक्षेप असल्यास शिक्षणाधिकाऱ्यांकडे अपील करता येणार आहे. 12 नोव्हेंबरला रिक्त जागांची यादी प्रकाशित केली जाईल. 20 ते 22 नोव्हेंबरदरम्यान बदली प्रक्रिया चालविण्यात येईल. 11 व 13 डिसेंबरदरम्यान विस्थापित शिक्षकांच्या फेरीसाठी पर्याय भरता येतील. 14 ते 16 डिसेंबर या कालावधीत विस्थापित शिक्षकांसाठी बदली प्रक्रिया राबविण्यात येईल. 17 डिसेंबरला रिक्त पदांची यादी जाहीर होईल. 18 रोजी बदलीपात्र शिक्षकांची (10 वर्षे सुगम क्षेत्रात काम केलेले शिक्षक) यादी प्रसिद्ध होईल. 19 ते 21 डिसेंबरदरम्यान अवघड क्षेत्रात रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठी फेरी होईल. 22 ते 24 डिसेंबरला बदली प्रक्रिया चालविली जाईल. 25 डिसेंबरला प्रत्यक्ष बदलीचा आदेश प्रकाशित होईल.