
सातारा येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या दोन वायुवेग पथकांमार्फत राष्ट्रीय महामार्गासह व राज्य मार्गावर खासगी बसेसवर कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत कार्यालयाकडून 533 खासगी बसेसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
दुर्घटना टाळण्यासाठी सातारा येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत सातत्याने दोन पथकांमार्फत राष्ट्रीय महामार्गासह व राज्य मार्गावर खासगी बसेसची तपासणी करण्यात येत आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी बसचालकांविरोधात सातारा येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाईचा बडगा उगारला आहे. आरटीओने आजअखेर अवैधरीत्या प्रवासी बसमधून माल वाहतूक करून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे, क्षमतेपेक्षा जादा मालाची वाहतूक करणे, अवैधरीत्या चालकांच्या केबिनमध्ये प्रवासी अथवा मालाची वाहतूक करणे, प्रवासी वाहतूक परवाना नसणे, टपावर माल ठेवणे यांसह अन्य प्रकारच्या कारवाईचा बडगा खासगी ट्रॅव्हल्सवर करण्यात येत आहे.
सातारा आटीओच्या दोन वायू वेग पथकामार्फत आजअखेर 533 खासगी ट्रॅव्हल्सवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिली. शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवशीही वायुवेग पथकामार्फत खासगी ट्रॅव्हल्सवर तपासणीची मोहीम महामार्गासह राज्यमार्गावर होती. सर्वांत जास्त खासगी ट्रॅव्हल्सवर सातारा कार्यालयाने कारवाई केली असून, त्यांची वरिष्ठ कार्यालयाने नोंद घेतली आहे. खासगी ट्रॅव्हल्स बसची तपासणी मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे विनोद चव्हाण यांनी सांगितले.



























































