
सामना प्रतिनिधी । पाथर्डी
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सादर केलेल्या विहिरीच्या प्रस्तावाला मान्यता मिळावी या मागणीसाठी बुधवारी निवडुंगे येथील ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह केला. गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर सत्याग्रह मागे घेण्यात आला. आंदोलनाचे नेतृत्व निवडुंगे गावचे उपसरपंच आसाराम ससे यांनी केले.
2013 पासून तालुक्यातील अनेक गावातील ग्रामस्थांनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत आपल्याला विहीर मिळावी असे प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केला आहे. मात्र, या पैकी एकाही प्रस्तवाला पंचायत समितीने मंजुरी दिली नसल्याचा आरोप करत आसाराम ससे,शंकर भाकरे,राजेंद्र मरकड,जगन्नाथ धावले,सुरेश नवगिरे,अंकुश देवकर,विष्णू बुधवंत यांनी समिती कार्यलयासमोर बैठा सत्याग्रह सुरु केला. आंदोलनाशीपूर्वी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सोमनाथ खेडकर यांनी चर्चा केली. मात्र तोडगा न निघाल्याने सुधाकर मुंडे यांचेशी खेडकर यांनी आंदोलकांशी चर्चा घडवून आणल्या. त्यानंतर तातडीने प्रस्ताव मंजूर केले जातील असे आश्वासन मुंडे यांनी दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.





























































