ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील मोर्चादरम्यान सौरभ भारद्वाज यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, कारवाईवर केजरीवाल यांनी संताप व्यक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी रविवारी दिल्लीतील इंडिया गेटकडे निषेध मोर्चा काढणाऱ्या आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये आप’च दिल्ली प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री सौरभ भारद्वाज यांचाही समावेश आहे. भारद्वाज यांनी पोलिसांवर धक्काबुक्की केल्याचा आरोप केला असून, या कारवाईचा आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी निषेध केला आहे.

ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांच्या बसमधून माध्यमांशी संवाद साधताना सौरभ भारद्वाज यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “पोलिसांनी आम्हाला अत्यंत चुकीच्या पद्धतीने हाताळले. मला उचलून एखाद्या फुटबॉलसारखे फेकण्यात आले.” पोलिसांनी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांशी हुकूमशाही पद्धतीने गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांनी केला.

अरविंद केजरीवाल यांची टीका

या कारवाईनंतर अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. लोकशाहीत शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे हा नागरिकांचा आणि राजकीय पक्षांचा अधिकार असून, अशा पद्धतीने दडपशाही करणे हे लोकशाहीला घातक असल्याचे मत त्यांनी व्यक्त करत पोलिसांच्या कृतीचा निषेध केला.